नवी मुंबईत १५ बांगलादेशी ताब्यात; धुळ्यातील महामार्गावर लूटमारीचा उलगडा, चोरट्याला ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबईत :- मागील काही दिवसांपासून भारतात अवैधपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशीना ताब्यात घेण्यात येत आहे. त्यानुसार नवी मुंबईमध्ये १५ बांगलादेशी ताब्यात घेतले आहेत. धुळ्यात देखील काही दिवसांपूर्वी बांगलादेशी आढळले होते. तर धुळे शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहावर मागील काही दिवसांपूर्वी जबरी लूटमार झाल्याची घटना घडली होती. पोलिसांकडून तपास करत लूटमार करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करत त्याने आणखी कोठे चोरी केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या जबरी लुटमारीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. घटना सातत्याने घडत असल्याचे निदर्शनास आले असता या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. यातच संशयित आरोपी हा महामार्गावरील हॉटेल कल्पेश जवळ उभ्या असलेल्या गाडीतील व्यक्तीचा मोबाईल व पैसे जबरदस्ती हिसकावले होते. त्या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांनी चक्रे फिरवत आरोपी वसीम रंगरेज याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.
३६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
घडलेल्या जबरी चोरीचा गुन्हा धुळे तालुका पोलिसांनी उघडकीस आणून ताब्यात घेतलेल्या वसीम यांच्याकडून ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या या चोरट्याने यापूर्वी देखील अशा घटनांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे का आणि त्यासह आणखी कोणी त्याचे साथीदार आहेत का? याचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.
१५ बांगलादेशींना अटक
नवी मुंबई : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करुन वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलीसांनी विशेष मोहीम राबवली. मागील दोन दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून तब्बल १५ बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बांगलादेशी नागरिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्डसह त्यांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. हे बांगलादेशी नागरिक भारतात कसे आले यांचा तपास आता पोलीस करत आहेत.