LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

धक्कादायक प्रकार उघड ! सतीश मामाचा काटा काढला, मोहिनी मामी-सोन्या जाळ्यात, हत्यार कुठे टाकलं ?

पुणे :- हडपसर येथील शेतकरी व हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा खून त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिच्या सांगण्यावरून अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर याने साथीदारांना पाच लाख रुपयांची सुपारी देऊन केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी मोहिनीने अक्षयला किती व कशा प्रकारे रक्कम दिली; तसेच सतीश वाघ यांचा खून करण्यामागे मोहिनीचा नेमका कोणता हेतू होता, त्यामागे अनैतिक संबंध, की आर्थिक कारण आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून मोहिनी वाघ वय ४८, रा. फुरसुंगी फाटा, मांजरी फार्मजवळ हिला बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मोहिनीने पती सतीश वाघ यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मोहिनीला गुरुवारी वानवडी येथील लष्कर न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले.

मोहिनीला पोलिस कोठडी

ही घटना पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी आहे. सतीश वाघ यांचा खून करण्यामागे मोहिनीचा नेमका कोणता उद्देश होता. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोण आहे. मोहिनीने सुपारीच्या रकमेपैकी अक्षयला किती रक्कम दिली, ती कशा प्रकारे दिली आहे. अक्षयने हा गुन्हा नक्की कोणत्या कारणासाठी केला, आरोपींनी गुन्हा करण्यासाठी हत्यार नक्की कोठून आणले, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील डॉ. आम्रपाली कस्तुरे यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने मोहिनी वाघला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सतीश वाघ यांच्या मालकीच्या खोलीत आरोपी अक्षय जावळकर आपल्या आई-वडिलांसोबत सुमारे पंधरा वर्षे वास्तव्यास होता. त्याने २०१६ मध्ये सतीश वाघ यांचे घर सोडून त्याच वसाहतीत पाचशे मीटर अंतरावर दुसरे घर भाडेतत्त्वावर घेतले होते. अक्षयने चारही मारेकऱ्यांना पाच लाख रुपयांची सुपारी देण्याची कबुली दिली होती. त्यापैकी आगाऊ म्हणून दिलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. मोहिनीकडून अक्षयला सुपारीची रक्कम कशी देण्यात आली, याबाबतचे पुरावे शोधण्यात येत आहेत, असे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी माध्यमांना सांगितले.

भीमा नदीत टाकले हत्यार

आरोपी नवनाथ गुरसाळे व अतिश जाधव यांनी सतीश वाघ यांचा खून केल्यावर वापरलेले हत्यार पेरणे फाटा येथे भीमा नदीच्या पात्रात टाकल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. या दोन्ही आरोपींच्या माध्यमातून नदीपात्रात शोध मोहीम राबवून हत्यार जप्त करायचे आहे, असे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी न्यायालयात सांगितले.

आरोपींनाही पोलिस कोठडी

सतीश वाघ अपहरण व खून प्रकरणात पवन श्यामसुंदर शर्मा वय ३०, रा. काळूबाई नगर, आव्हाळवाडी, वाघोली, नवनाथ अर्जुन गुरसाळे वय ३१, रा. गणेशनगर, डोमखेल रोड, वाघोली, मूळ रा. खोकरमोहा, बीड, विकास उर्फ विक्की सीताराम शिंदे वय २८, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली, मूळ रा. अरणगाव, अहिल्यानगर, अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर वय २९, रा. फुरसुंगी फाटा, मूळ रा. खानापूर, वेल्हे यांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती.

न्यायालयाने या आरोपींच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती, तर अतिश संतोष जाधव वय २०, रा. काळपेवाडी रोड, लोणीकंद, मूळ रा. उमरेकोठा, ता. कळंब, जि. धाराशिव याला न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता सतीश वाघ यांच्या खुनात पत्नी मोहिनीचा सहभाग निष्पन्न झाल्याने एकत्रित चौकशीसाठी न्यायालयाने सर्व आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!