नववर्षाच्या स्वागतासाठी अमरावतीत कडक पोलिस बंदोबस्त

नववर्षाच्या आगमनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर येणार असल्याने अमरावती पोलिस आयुक्तालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये व उड्डाणपुलांवर नाकाबंदी व बॅरिकेडिंग करण्यात येईल. या उपक्रमांमध्ये ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम, स्टंट रायडिंगवर कारवाई, आणि वाहन चालवताना उच्च वेगाने वाहन चालवणाऱ्यां विरोधात इंटरसेप्टर वाहने कार्यरत राहतील. त्याचबरोबर पेट्रोलिंगसाठी पथके पायी आणि दुचाकीवर गस्त घालतील. 31 डिसेंबर रात्री ८ वाजल्यापासून 1 जानेवारी सकाळी ५ वाजेपर्यंत, शहरातील सर्व उड्डाणपुलांवर वाहनाची वाहतूक बंद ठेवली जाईल. ही कारवाई पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी केले आहे. नववर्षाच्या आगमनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. मद्यप्राशन करून सुसाट वाहने चालवतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा पोलिस बंदोबस्त लावण्यात येतो. त्यामुळे आनंद साजरा करताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, जेणे करून आनंदावर विरजण पडणार नाही यांची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी.