तिसरी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परीसरात एका पतीने तिसरी मुलगी झाल्यानंतर आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी कुंडलिक उत्तम काळे (वय ३२) याने तिसरी मुलगी झाल्यानंतर पत्नी मैनावर वारंवार राग काढला आणि तिच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.
मृत मैना यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, कुंडलिक सतत पत्नीला शिवीगाळ करत असे आणि मुलगा न झाल्याबद्दल तिला दोषी ठरवत असे. “तीन मुलीच कशा जन्माला आल्या? मला मुलगाच हवा होता,” असे म्हणत तो पत्नीला धमकावत असे. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने या प्रकरणात पुरावे मिळाले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही घटना समाजातील स्त्री आणि मुलींबाबतच्या संकुचित दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उभा करते. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि लिंगभेदाविरुद्धच्या लढाईवर पुन्हा विचार करावा लागेल.