LIVE STREAM

AmravatiLatest News

मोर्शी नगर परिषदेची विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत- खासदार डॉ. अनिल बोंडे

मोर्शी शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करावे. तसेच मोर्शी नगरपरिषद येथील जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर असलेली कामे आणि इतर विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत ,असे निर्देश खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे विविध विषयांचा आढावा खासदार डॉ .बोंडे यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र, अपर जिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक महेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार डॉ. बोंडे म्हणाले, मोर्शी, वरूड, शे.घाट नगरपरिषद हद्दीतील पीआर कार्ड त्वरित वितरित करण्यात यावे. पीआर कार्ड नसल्यामुळे घरकुलाचा लाभ येथील लाभार्थ्यांना मिळण्यास अडचणी येत आहेत. प्रलंबित पीआर कार्ड प्रकरणांचा निपटारा कडून नागरिकांना कार्ड मिळवून द्यावे. येथील प्रलंबित पीआर कार्ड प्रकरणांची संख्या तसेच प्रलंबित असल्याची कारणे याबाबत काटेकोर आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करुन याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच दलित वस्ती मधील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावी. मोर्शी तालुक्यातील लाडकी, येरला येथील पाण्याची टाकी शिकस्त झाली आहे. ती धोकाग्रस्त असल्यामुळे नवीन बांधण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी .तसेच नगरपरिषद शेघाट येथील जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर असलेल्या रकमेमधून प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यावी. पर्यटनाचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. मौजा नांदुरा येथील ‘जय जवान जय किसान निसर्ग पर्यटन केंद्रा’ला चालना देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी , अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वरुड नगर परिषद हद्दीतील आठवडी बाजार भरत असलेल्या जागेवर आरक्षण काढून लाभार्थ्यांना पट्टेवापटप करण्यात यावे. याशिवाय वरूड तालुक्यातील एकालविहीर ते लिंगा रस्त्यासाठी अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना त्वरित मिळवून देण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी. स्केटिंग खेळाचा प्रसार होण्यासाठी मोर्शी शहरातील क्रीडा संकुलाच्या किंवा नगर परिषदेच्या खुल्या जागेवर 20 हजार स्क्वेअर फूट जागेवर रोलर स्केटिंग रिंग तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.

खासदार डॉ. बोंडे यांनी जिल्हा परिषद अंतर्गत विविध विषयांचाही आढावा घेतला. यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या, मनरेगा अंतर्गत विकास कामे, नांदगाव पेठ येथील काशीनाथ बाबा मंदीर देवस्थानासंदर्भात आढावा घेतला .मेळघाट येथील आमनेरी किल्ला स्थळ पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याबाबत आराखडा तयार करण्यासंदर्भात सूचना दिल्या. शहरे अतिक्रमणमुक्त व्हावी, यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही ते यावेळी म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!