15 जानेवारीपर्यंत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’कार्यक्रम
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय, सहायक ग्रंथालय संचालक कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शासकीय विभागीय ग्रंथालयात दि. 1 जानेवारीपासून सुरू झाला असून दि. 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण, कथन स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संदर्भ ग्रंथाचे प्रदर्शन मंगळवार, दि. 31 डिसेंबर रोजी करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. महेंद्र मेटे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. सहाय्यक ग्रंथालय संचालक राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.
गजानन कुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरज मडावी यांनी आभार मानले. सदर उपक्रम दि. 15 जानेवारीपर्यंत शासकीय सुटी वगळून चालणार आहे, या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी यांनी केले.