नेपाळ सीमेवर ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत ९५ मृत्यू; भारतातही जाणवले धक्के

नेपाळच्या सीमेजवळ दक्षिण तिबेट मंगळवारी सकाळी भूकंपाच्या मालिकेने हादरले, ज्याचे धक्के उत्तर भारतातील अनेक भागातही जाणवले. यातील सर्वात शक्तिशाली, ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का, नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर या प्रदेशातील सर्वात शक्तिशाली होता. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामध्ये सुमारे दहा हजार लोक मारले गेले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, तिबेट भागातील जिजांगमध्ये मंगळवारी सकाळी भूकंप झाला. येथे सकाळी ६.३० वाजता १० किमी खोलीवर ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर ७:०२ वाजता ४.७ रिश्टर स्केलचा, ७:०७ वाजता ४.९ रिश्टर स्केलचा आणि ७:१३ वाजता पाच रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
सोशल मीडिया युजर्सनी केलेल्या पोस्ट्सनुसार, पाटणा आणि सारणसह बिहारच्या काही भागांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यावेळी पश्चिम बंगाल आणि आसामच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सोशल मीडिया युजर्सनी सांगितले आहे.
या भूकंपांच्या मालिकेचा भारतावरही परिणाम झाला आहे. भारतातील बिहार, बंगाल आणि आसाममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र, नेपाळमध्ये किती जीवित किंवा वित्तहानी झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात भूकंपानंतर लोक घराबाहेर पडताना आणि बाहेर उघड्यावर उभे असल्याचे दिसत आहे.
बिहारच्या मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझफ्फरपूर येथे सकाळी ६.४० च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले.
नेपाळमध्ये २०२५ ची सुरुवात भूकंपाच्या धक्क्यांनी झाली आहे. नेपाळमध्ये गेल्या ७ दिवसात ३ वेळा भूकंप झाला आहे. यामध्ये ३ जानेवारीला झालेल्या भूकंपाची ४.४ रिश्टर स्केल एवढी होती. तर, २ जानेवारीच्या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतकी होती.