ट्रेड फेअर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसादस्टार्टअप्स संकल्पनांना मिळाला वावविद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटर व जे.सी.आय. चा संयुक्त उपक्रम

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि अमरावती जे.सी.आय. च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरातील व्हाईट हाऊस लॉन येथे संपन्न झालेल्या ट्रेड फेअर मेळाव्याला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामध्ये अभिनव उपक्रम सादर करण्यात आले होते, त्याचा अमरावतीकरांनी लाभ घेतला. त्यामुळे स्टार्टअप्स सारख्या संकल्पनांना मोठा वाव मिळाला आहे. मेळाव्याचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी भूषविले. स्टर्टअप्स आणि नाविन्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे व विद्यापीठातील रिसर्च आणि इनक्युबेशन फाऊंडेशन नवकल्पनांच्या प्रोत्साहनासाठी कटिबद्द असल्याचे याप्रसंगी कुलगुरू म्हणाले.
इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर यांनी सेंटरबद्दल माहिती दिली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव यांनी कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. मेळाव्यात 11 स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना नामवंत लेखापाल, उद्योजक आणि गुंतवणूकदारांसमोर सादर करण्याची संधी मिळाली. नाविन्यतेला चालना देणे आणि उदयोन्मुख व्यवसायांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे हा उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी श्री विनय नागलकर यांनी हातातील नस दिसण्यासाठी यंत्र, वेदांत भेंडकर यांनी बहिरे असलेल्यांसाठी ऐकण्याचे चष्मे, अनुजा कडू यांनी आरोग्यदायी ऑइल-फ्री चिप्स, खाकरा, पास्ता, नूडल्स, विश्राम बापट यांनी मोरिंगा चहा, अर्जून माहुरे यांनी आय.ओ.टी. आधारित खेळणी, गजानन भारसाकळे यांनी शेणाच्या गोव-यांचे विविध उपयोग, चिंतन झाडे यांनी हर्बल ब्युटी साबण, गणेश बाकडे यांनी ए.आय. व एम.एल.गायडन्स आधारित डिजिटल शिक्षणाचे संशोधन सादर केले.
याप्रसंगी जे.सी.आय. अमरावतीचे अध्यक्ष श्री दीपक लोखंडे यांनी नवउद्योजकांसाठी ही मोठी संधी या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचे सांगितले. स्टार्टअप्सनी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना वित्तपुरवठा मिळवण्यासाठी हा कार्यक्रम एक उत्तम व्यासपीठ ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जे.सी.आय. प्रकल्प संचालक अंकित पुरवार, जयेश पनपालिया, अमोल झंवर, नागराज पाटील, हिमांशू अग्रवाल, संतोष बेहरे यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री अमोल हिरुळकर यांनी कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी केली. मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता श्री नरेश मोवळे, श्री रविकुमार ढेंगळे, ऋषिकेश हळदे, साक्षी मलंगे, मयूरी घारड यांनी अथक परिश्रम घेतले.