महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडून स्वच्छता कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शनिवार दि.११ जानेवारी,२०२५ रोजी सकाळी शहरातील बस डेपो, राजकमल चौक, गांधी चौक, परकोट, नागपुरी गेट, बापट चौक, रविनगर रोड, नवाथे परिसरातील स्वच्छतेच्या कामाची तसेच आयसोलेशन दवाखान्याची पाहणी केली. तथा स्वच्छतेत हाराकिरी सहन करणार नाही, अशी प्रशासकीय तंबी संबंधितांना दिली. स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेत त्यांनी हजेरी बुकांची तपासणी केली.
स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार व घंटागाडी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत स्वच्छता करतांना रस्त्याचे साईड पट्टी स्वच्छता करण्यात यावी अशी सक्त सूचना त्यांनी केली. कचरा परिसर स्वच्छ करुन त्वरित तो कचरा घंटागाडीत टाकण्याबाबत निर्देश दिले. मार्केट परिसरात स्वच्छतेप्रमाणेच प्रत्येक विक्रेत्यांकडे कच-यासाठी डबा असलाच पाहिजे, असे निर्देश देऊन मार्केट जवळील कंपोस्ट पिट्स व्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिशवी असताच कामा नयेत, असा कडक इशारा आयुक्तांनी दिला.
हयगय नकोच, अन्यथा कारवाई साफ सफाईच्या कामात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशी तंबी देत संपुर्ण परिसर, नाले १०० टक्के साफ झाले पाहिजेत, रोड साईडला गवत दिसायला नको, दुभाजक स्वच्छ असावेत. शहरातील विविध भागात त्यांना नारळ पडलेले दिसले. अशा हातगाडयांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.
रस्ते सफाईच्या कामात सुधारणा करण्याची अखेरची संधी आहे असा इशारा अमरावती महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सफाई ठेकेदारांना दिला.
महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी रस्ते सफाईच्या गुणवत्तेबद्दल काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यानुसार, स्वच्छतेबद्दलची परिस्थिती सुधारण्यासाठी महानगरपालिका वेगवेगळी पावले उचलत आहे.
सदर परिसरातील स्वच्छतेची पाहणी आयुक्तांनी संपूर्ण परिसरात फिरून केली. शहर परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देतानाच एच एम पी व्ही या विषाणूपासून सुरक्षा नियमांचेही नागरिकांकडून पालन होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. सदर परिसरातील स्वच्छतेबाबत अधिक दक्ष राहून परिसर स्वच्छतेची कार्यवाही करावी असे आदेशित करतानाच आयुक्तांनी परिसरातील घरांमधून ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जावा व महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींकडे तो वेगवेगळा दिला जावा यादृष्टीने अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना केल्या.
या पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आयसोलेशन दवाखान्याची पाहणी केली. महानगरपालिकेच्या आयसोलेशन दवाखान्यामध्ये वैद्यकीय सेवा सुरू आहे. दवाखान्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्याची व औषधांचा पुरवठ्याची माहिती महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी घेतली. यावेळी आयुक्तांनी आयसोलेशन दवाखान्याला भेट देऊन रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्तांनी सर्व आशांना निर्देश दिले की, सदर परिसरात व शाळांमध्ये आरोग्या बाबत जनजागृती करावी व शिबिराचे आयोजन करावे. एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी, दवाखान्यातील स्टाफ, स्वास्थ निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.