अमरावती महानगरपालिका क्षेत्रात झाली विशेष स्वच्छता मोहीम
महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे यासाठी महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका उत्तर झोन क्र.१ रामपुरी कॅंम्प, मध्य झोन क्र.२ राजापेठ व पश्चिम झोन क्र.५ भाजीबाजार यांच्या वतीने रविवारी सकाळी नागपुरी गेट ते चित्रा चौक या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत उत्तर झोनचे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, मध्य झोनचे सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु डिक्याव, विजय बुरे, राजेश राठोड, स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार, मनपा कर्मचारी, सफाई मित्र, पर्यवेक्षक यांनी सहभाग घेतला. सदर परिसरातील रस्ता येथे सुरू असलेल्या स्वच्छतेची सहाय्यक आयुक्तांनी पाहणी केली तसेच तेथे असलेल्या नागरिकांची संवाद साधून स्वच्छता याबद्दल त्यांची मते जाणून घेतली.
या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त यांच्यावर होती. तर, सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी मा.आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक संबंधीत अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. या सफाई मोहिमेत दैनदिन साफसफाई सोबत मोठे आणि अंतर्गत रस्ते यांची सर्वंकष सफाई, पदपथ, रस्ते दुभाजक यांची सफाई करण्यावर भर देण्यात आला. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा, झाडाच्या फांद्या, कचरा उचलण्यात आला.
तसेच फेरीवाले त्यांच्याकडून टाकला जाणारा कचरा, अनधिकृत पार्किंग आदी समस्याही मांडल्या. नागरिकांनी या भागात कचरा पडणार नाही यासाठी सतर्क राहावे, महापालिकेचे कर्मचारी त्यांचे काम करतीलच, पण कचरा टाकण्याच्या नवीन जागा तयार होणार नाहीत, याची दक्षता स्थानिकांनीही घ्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
सदर परिसरातील दुकानदारांची व फेरीवाल्यांची तपासणी करुन प्लास्टीक जप्ती मोहीम राबविण्यात आली तसेच प्लास्टीक बाबत दुकानदारांना व फेरीवाल्यांना दंड ही आकारण्यात आला. या मोहीमेत फेरीवाल्याची तपासणी करतांना एका फेरीवाल्याच्या हातगाडी जवळ कचरा आढळून आल्याने तो कचरा त्वरीत उचलण्यात यावा असे सक्त निर्देश सहाय्यक आयुक्तांनी दिले.
या मोहीमेत प्रत्येक दुकानदाराने दुकानाबाहेर अतिक्रमण करु नये. दुकानदाराने व फेरीवाल्याने ओला व सुका कचरा वेगवेगळा करुनच द्यावा तसेच कचरा इतरत्र न फेकता घंटागाडीत द्यावा. कोणताही दुकानदार, फेरीवाला व नागरिक इतरत्र कचरा फेकतांना आढळून आल्यास त्यांची माहिती संबंधीत प्रभागाच्या स्वास्थ निरीक्षकाला देण्यात यावी. सदर दुकानदाराने व फेरीवाल्याने स्वच्छतेबाबत महानगरपालिकेच्या नियमाचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले आहे.