मनपा मराठी शाळा क्रमांक 18 येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न

स्थानिक प्रवीण नगर स्थित महानगरपालिका मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 18 येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुधीर धोत्रे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुंदडा शहरी आरोग्य केंद्र प्रवीण नगर हे उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली.
स्वराज्य स्थापनेसाठी व शिवरायांना घडविण्यासाठी जिजामातांची जी भूमिका राहिली त्याला तोड नाही. तसेच आपल्या भारताची अस्मिता व संस्कृतीची महानता जगभरात पोहोचवणारे स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची आज देशाला गरज असल्याचे विचार व्यक्त करण्यात आले. त्यानंतर डॉ मुंदडा यांनी नुकताच आलेला व्हायरस एच एम पी व्ही याबाबत सतर्कता बाळगण्याचे व आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्वांना आवाहन केले.तसेच उपस्थित ए एन एम यांनी नायलॉन मांजा न वापरण्याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले.
सर्वांनी यावेळी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु वैशाली महाजन यांनी केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक मंजू वानखडे,चैताली टोबरे, योगिता हेडाऊ, स्वाती धांडगे, भाग्यश्री ढोमणे,रहीम खान, प्रीती भोकरे, शुभांगी उंबरकर,वैशाली केने, कांचन सोळंके तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.