AmravatiLatest News
प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे – उपायुक्त गजेंद्र बावणे

अमरावती, दि.13 : नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक
आहे. विभागीय लोकशाही दिनाकरिता दाखल प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळेत प्राप्त करुन प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी सर्वंकष प्रयत्न करावे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारास लेखी पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे निर्देश उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी आज येथे दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण सहा प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्री. बावणे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. सहाय्यक आयुक्त राजेंद्र फडके, सहा. आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह पोलीस, महापालिका, महसूल, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 4 स्वीकृत अर्ज (प्रलंबित प्रकरणे) व 2 अस्वीकृत अर्ज (सामान्य तक्रार अर्ज) अशा एकूण 6 अर्जावर सविस्तर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली.
लोकशाही दिनासाठी उपस्थित तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. बावणे यांनी संबंधित विभागांना यावेळी दिले.