राष्ट्रमाता जिजाऊंचा स्वाभिमान व शौर्य महिलांनी अंगीकारणे काळाची गरज – आमदार सौ. सुलभाताई खोडके
राजमाता जिजाऊ झाल्या नसत्या तर शिवबा घडले नसते व स्वराज्य निर्मितीही होऊ शकली नसती. तसेच आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांचे कार्यक्षेत्र हे मध्ययुगीन काळातील स्त्रियांप्रमाणेच दुर्लक्षित राहिले असते व समाजात ज्या पद्धतीने स्त्रिया या आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर झाल्या आहे. त्या पद्धतीने त्या झाल्या नसत्या त्यामुळे जिजाऊंचा बाणा, धाडसी वृत्ती, निर्भयता व शौर्य आजच्या काळातील सर्वच मुली व महिलांनी अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत आयोजित राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध निवेदिका क्षिप्राताई मानकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनीषा कोडापे तसेच डॉ. विद्याताई शर्मा व बाल शौर्य पुरस्कार प्राप्त कु. करीना थापा उपस्थित होत्या.
सौ. सुलभाताई खोडके पुढे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ यांनी कठीण काळातही स्वाभिमानी वृत्ती जोपासली व विविध जुलमी मुसलीम शाह्रांसोबत लढण्यासाठी शिवबांना प्रवृत्त केले व प्रत्येक युद्धात मग ते प्रतापगडावरील अफजलखानाचा वध असो वा शाहिस्तेखाना वरील छापा असो की पन्हाळावरून सिद्धी जोहरच्या ताब्यातून निसटणे असो, इत्यादी अनेक बाबतीत शिवरायांना मौलिक मार्गदर्शन करून स्त्री-शक्ती कशी निर्भय असू शकते, याची प्रचितीही त्यांनी दिली.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करून उत्कृष्ट पायंडा पाडला असून संपूर्ण महाराष्ट्रात हे विद्यापीठ कातुकास पात्र आहे. आपण आमदार या नात्याने कोणतीही मदत या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाकडून मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. या उत्कृष्ट अभ्यासक्रमातून भावी पिढी निश्चितच घडू शकेल, असेही त्या म्हणाल्या.
प्रमुख वक्ते क्षिप्राताई मानकर यांनी राजमाता जिजाऊच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी स्त्री-शक्ती साठी जिजाऊंनी केलेले योगदान सर्वांनी वाचावे, असे आवाहन केले. याप्रसंगी सौ. सुलभाताई खोडके, डॉ. मनीषा कोडापे, डॉ. विद्या शर्मा व कु. करीना थापा यांना ‘जिजाऊंची लेक’ हा पुरस्कार विद्यापीठाच्यावतीने प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंजुषा बारबुद्धे, संचालन डॉ. अश्विनी टाले व आभार प्रदर्शन प्रा. वृषाली जवंजाळ यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.