Crime NewsLatest NewsMaharashtra
पहाटेच्या वेळी हॉटेल मॅनेजरकडे दारुची मागणी, नकार दिल्याने थेट चाकू हल्ला; बारामतीत खळबळ

पहाटेच्या वेळी दारू पाहिजे म्हणून बंद झालेल्या हॉटेलच्या मॅनेजरवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील तीन आरोपींना माळेगाव पोलिसांनी हडपसरच्या गाडीतळ परिसरातून ताब्यात घेतले आहे. ही घटना मकर संक्रातीच्या दिवशी पहाटे पावणे दोन वाजता बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील शारदा हॉटेल येथे घडली होती.
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर शारदा हॉटेलचे मॅनेजर ऋषिकेश मिंड यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भारतीय नागरिक संहिता कलम 109,118(1), 118(2),333,115 (2),352, 3 (5) सह शस्त्र अधिनियम कलम 4/25 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या पहाटे पावणेदोन वाजता कऱ्हावागज हद्दीतील शारदा हॉटेलचे मॅनेजर हे झोपेत होते. तेव्हाच गावातील विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे (दोघेही रा. कऱ्हावागज, बारामती) व निखिल अशोक खरात (रा.आमराई, बारामती) हे तिघे तेथे आले. हॉटेल मॅनेजर ऋषिकेश मिंड यांच्या रूममध्ये घुसून शिवीगाळ करीत, मला दारू देत नाहीस का? आमच्याच गावात हॉटेल चालवून आम्हालाच नडतो काय? आता तुला सोडतच नाही. आता आम्हाला नड..! असे बोलून मॅनेजरला मारहाण केली. त्यानंतर निखिल खरात याने त्याच्या जवळील असलेले धारदार चाकूने मिंड यांच्यावर हल्ला केला. ते पटकन मागे सरकले. त्यामुळे तो वार मिंड यांच्या पायावर लागला.
यादरम्यान हॉटेलमधील कामगार दिनेश वर्मा हा वाचविणे करिता मध्ये आल्याने निखिल खरात याने दिनेश वर्मा (मूळ रा.उत्तर प्रदेश) याच्या पोटात धारदार चाकू खुपसून तसेच इतर कामगारांवर देखील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे तिघेही चारचाकी वाहनातून पळून गेले. या घटनेबाबत माळेगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी तिघांच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक नेमले. या तिघांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पहाटेच्या वेळी हडपसरच्या गाडीतळ परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.