LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

मोठी बातमी! महाराष्ट्रात Bird Flu चा प्रादुर्भाव; प्रशासनाकडून Alert Zone ची घोषणा

लातूरमधील उदगीर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये अचानक कावळे मरुन पडण्याच्या घटनांमधील रहस्यावरील पडदा उठला आहे. उदगीर शहरातील कावळ्यांच्या रहस्यमयी मृत्यूमागे बर्ड फ्ल्यूचा संसर्ग कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच लातूर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील 10 किलोमीटर क्षेत्र ‘अलर्ट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या अलर्ट झोनमधील कुक्कुटपालन केल्या जाणाऱ्या पक्ष्यांचे सर्वेक्षण केलं जाणार असून वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार आहेत.

नवे आदेश जारी; कोणकोणते निर्बंध?
उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूच्या विषाणूजन्य आजाराने झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथील 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित केला आहे. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या ठिकाणची खाजगी वाहने बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर अंतरावरील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्याचे आदेशात देण्यात आले आहेत.
उदगीरमध्ये नक्की घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, उदगीर शहरातील तीन ठिकाणी कावळ्यांच्या मृत्यूचे प्रकार घडला. शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर आणि शहर पोलीस ठाण्याचा आवारात मोठ्या संख्येनं कावळ्यांचे अस्तित्व आहे. मात्र मागील काही दिवसांपासून अनेक कावळे झाडांच्या खाली मृतावस्थेत पडलेले आढळून आले. सुरुवातीला याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र सलग दुसऱ्या दिवशीही असेच कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे लातूरमधील पशु वैद्यकीय विभागाने या कावळ्यांचे मृतदेह गोळा करुन ते चाचणीसाठी पाठवून दिले.

मान वाकडी व्हायची अन्…
हे कावळे मृत्यूमुखी पडण्याची पद्धतही फार विचित्र हे कावळे मृत्यूमुखी पडण्याच्या पद्धतीमध्येही फारच विचित्र साम्य दिसून आलं. कावळ्यांची मान अचानक वाकडी होते. सुसुत्रता गमावल्याप्रमाणे आणि तोल गेल्याने एखादी व्यक्ती झाडावरुन खाली पडते तसे हे कावळे झाडांच्या फांद्यावरुन जमिनीवर कोसळतात. अशा पध्दतीने कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचे प्रकार उदगीर शहरातील तीन ते चार ठिकाणी घडले. एकंदरित या कावळ्यांच्या मृत्यूचा आकडा हा दिडशेहून किंचित अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!