LIVE STREAM

AmravatiLatest News

पाच लाख रुपये किमतीचे श्रवणयंत्र चोरीला गेले; लहान मुलाच्या भवितव्यासाठी मदतीचा आवाहन

अमरावती : बस स्थानकावरील गर्दीतून वाट काढत ती आई दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला घेऊन बसजवळ पोहचते. धक्काबुक्की सहन करीत ती बसमध्ये चढते. आसनावर बसताच तिला धक्का बसतो. कारण तिची पर्स चोरीला गेलेली असते. या पर्समध्ये सोन्या, चांदीच्या दागिन्यांपेक्षा मौल्यवान अशी वस्तू ठेवलेली असते आणि ती वस्तू कशी मिळेल, या विवंचनेत सैरभैर झालेली ती माता पोलीस ठाण्यात पोहचते. पोलीस तक्रार नोंदवून घेतात. पर्समधून चोरीला गेलेले ते एक श्रवणयंत्र असते आणि त्याची किमंत सुमारे ५ लाख रुपये आहे. आता या श्रवणयंत्राचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सध्या समाजमाध्यमांवर एक आवाहन प्रसारित झाले आहे. त्यात हे श्रवणयंत्र कुणालाही आढळून आल्यास शहर कोतवाली पोलिसांकडे पोहचते करण्याची विनंती करण्यात आली आहे. कारण हे श्रवणयंत्र त्या दोन वर्षीय चिमुकल्याखेरीज कुणाच्याही उपयोगाचे नाही.
पूजा स्वप्निल खडसे (२४, रा. दिलावरपूर, ता. चांदूर रेल्वे) या गेल्या १३ जानेवारी रोजी आपल्या गावी परतण्यासाठी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षीय मुलगा एकांश हा देखील होता. एकांश याला श्रवणदोष निश्चित झाला आहे. काही दिवसांपुर्वी एकांश याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकांश याला ऐकू यावे, यासाठी पाच लाख रुपये किमतीचे आधुनिक‍ श्रवणयंत्र खरेदी करण्यात आले होते. खडसे दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी या ‘कॉक्लिअर’ श्रवणयंत्राची किंमत अमूल्य. या श्रवणयंत्राच्या माध्यमातून एकांश याला ऐकू येऊ शकेल आणि तो बोलूही शकेल. या श्रवणयंत्राअभावी तो मूक-बधीर होण्याचा धोका आहे.
पूजा खडसे या चांदूर रेल्वे येथे जाण्यासाठी चिमूर आगाराच्या बसमध्ये चढल्या. बसमध्ये चढण्याच्या बेतात असताना, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लंपास केली. याच पर्समध्ये ५ लाख रुपये किमतीचे श्रवणयंत्र ठेवण्यात आले होते.
पूजा आणि तिचे पती स्वप्निल खडसे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी या श्रवणयंत्राचा शोध सुरू केला आहे.
हे श्रवणयंत्र कुणाच्याही उपयोगाचे नाही. मात्र, ते या मुलाच्या भवितव्यासाठी मोलाचे आहे. ते कुणालाही आढळून आल्यास कोतवाली पोलिसांना कळवावे, ही मदत एका लहान मुलाच्या सुंदर आयुष्यासाठी खूप महत्वाची ठरेल, असे आवाहन समाज माध्यमांवरून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!