पुण्यात डॉक्टर तरुणीने 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने केली आत्महत्या

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. मानसिक धक्क्यातून महिला डॉक्टरने क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत आत्महत्या केली आहे. महिलेची फसवणूक केलेल्या आरोपीचे नाव कुलदीप सावंत असं असून त्याच्या विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका २५ वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या तरुणासोबत लग्नाचं स्वप्न रंगवलं होतं, त्याच तरुणाने धोका दिल्याचे समजताच तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला. याच कारणातून पीडित डॉक्टरने विषारी औषध पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे.कुलदीप आदिनाथ सावंत असं आरोपी तरुणाचं नाव आहे.
आरोपी कुलदीप याने विवाहित असूनही मेट्रीमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून त्यांनी पीडितेशी संपर्क साधला होता. तसेच आपण लग्नासाठी इच्छुक असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं. सुरुवातीला पीडित महिला डॉक्टरने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिला. मात्र आरोपीनं पीडितेशी संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला. तिला लग्न करण्याचं आमिष दाखवत तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. ज्यावेळी तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा आरोपीनं लग्न करण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली.
डॉक्टर तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात करताच त्याने आपण विवाहित असून पत्नी गर्भवती असल्याचं तिला सांगितलं. होणाऱ्या पतीचा हा भूतकाळ समजल्यानंतर पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला. एवढेच नव्हे तर आरोपीनं पीडितेकडून घेतलेले दहा लाख रुपये परत देण्यास देखील टाळाटाळ केली.यातून नैराश्य आल्यानंतर पीडित डॉक्टर तरुणीने ७ जानेवारीला क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.
पिडीत तरुणीने आत्महत्यापूर्वी चिठ्ठीदेखील लिहल्याचे समोर आले आहे. तसंच, तिच्याच क्लिनिकमध्ये विषारी औषध प्राशन करुन तिने आत्महत्या केली आहे. नंतर तिला उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता पीडित तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.