LIVE STREAM

BollywoodLatest News

CCTV तील ‘तो’ अन् अटकेतील आरोपी वेगवेगळे? सैफ हल्ला प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा धक्कादायक दावा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील त्याच्या राहत्या घरी चाकूनं हल्ला करत एका अज्ञातानं घटनास्थळावरून पळ काढला होता. प्राथमिक माहितीनुसार ही घटना चोरीच्या हेतूनं झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर लगेचच तपासाची सूत्र हलली.
मुंबई पोलिसांनी जवळपास 20 पथकांच्या मदतीनं विविध सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेत सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला. यादरम्यानच CCTV Foortage मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी मिळताजुळता चेहरा असणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अखेर, मूळ आरोपीला ठाण्यातून बेड्या ठोकण्यात पोपलीस दलाला यश मिळालं. इथं आरोपीवर कारवाई करत त्याची चौकशी सुरू असतानाच तिथं सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, सैफवर हल्ला करणारा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरीही ही व्यक्ती आणि पहिल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती यांच्या चेहऱ्यांमध्ये काहीच साम्य नसल्याचा सूर अनेकांनीच आळवला. ज्याला दुजोरा देणारं एक वृत्त नुकतच समोर आलं आहे. सोशल मीडियावर पोलीस अटकेत असणारा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आणि सीसीटीव्हीतील इसम यांच्या चेहऱ्यांमध्ये साम्य नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच दैनिक भास्करनं फॉरेन्सिक एक्सपर्टची मदत घेत आणखी एक धक्कादायक दावा केला.
ब्रिलियंट फोरेंसिक इन्वेस्टिगेशन प्राइवेट लिमिटेडचा हवाला देत माध्यम समूहानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अटकेतील आरोपी आणि सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यांची पडताळणी करण्यात आली. ज्यामध्ये फोटो रेकग्नेशननुसार दोन्ही चेहऱ्यांमध्ये साम्य नसून बराच फरक आढळत असल्याची बाब समोर आली.
पडताळणीतून समोर आलेल्या माहितीनुसार शरीफुलचं कपाळ रुंद असून, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा काहीसा लांबट आणि रुंदीला कमी दिसत आहे. अटकेतील आरोपीचे डोळेही फुटेजमधील व्यक्तीशी जुळत नाहीयेत. इतकंच नव्हे, तर या दोन्ही फोटोंमध्ये भुवया पाहिल्या असता शरीफुलच्या भुवयांमध्ये कमी अंतर असून, दुसऱ्या व्यक्तीच्या भुवया एकमेकांपासून जास्त दूर असून, ओठ आणि नाकाच्या ठेवणीमध्येही बराच फरक आढळल्यानं अटक करण्यात आलेला आरोपी आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, यावर यंत्रणेकडून कोणताही अधिकृत खुलासा किंवा उलगडा करण्यात आलेला नाही याची नोंद घ्यावी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!