क्रेडिट कार्ड कस्टमर केअरच्या नावाखाली 3 लाख 26 हजार 500 रुपयांची ऑनलाईन फसवणूक!

“फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, आणि अशाच एका धक्कादायक प्रकरणात नागपूरच्या साईनगर हरिओम कॉलनीतील 64 वर्षीय मनोहर वासनकर यांची तब्बल 3 लाख 26 हजार 500 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. क्रेडिट कार्ड काढण्याच्या नावाखाली एका अज्ञात व्यक्तीने फोन करून वासनकर यांना फसवलं आहे.”
फिर्यादी मनोहर वासनकर यांना एका व्यक्तीने स्वतःला क्रेडिट कार्ड कस्टमर केअर प्रतिनिधी असल्याचे भासवून फोन केला. त्यांनी खोटी माहिती देत क्रेडिट कार्डसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून आर्थिक व्यवहार करण्यास प्रवृत्त केले. परिणामी, फिर्यादींच्या खात्यातून तब्बल 3 लाख 26 हजार 500 रुपये काढून घेतले गेले. याबाबत वासनकर यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मोबाईल धारकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 419, 420, तसेच आयटी कायद्याच्या कलम 66C आणि 66D अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“या प्रकाराने पुन्हा एकदा सायबर सुरक्षेचे महत्त्व समोर आले आहे. नागरिकांनी अशा फसवणूक फोन कॉल्सपासून सतर्क राहावे आणि आर्थिक व्यवहार करताना पूर्ण खबरदारी घ्यावी. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे.