संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

“माणसाचे मन हे संवेदनशील असते.ते विविध विषयांचा आस्वाद घेते. आस्वादणारे मन चिंतनशीलतेच्या प्रक्रियेला बळ पुरविते व या सर्जनप्रक्रियेमधून कवितेचा जन्म होतो. कविता ही कवीचा जसा आत्मशोध असतो तसा तो समाजमनाचाही शोध असतो. कवितेत अस्सल अनुभवांबरोबरच भाषेचे सौंदर्यही महत्त्वाचे असते. कविता ही खऱ्या अर्थाने मानवी मनाचा सर्जनशीलआविष्कार आहे,” असे प्रतिपादन डॉ. मोना चिमोटे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – २०२५ अंतर्गत ‘मराठी कविता : परंपरा आणि वर्तमान’ या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. आपल्या भाषणातमराठी कवितेचे प्राचीन, अर्वाचीन, साठोत्तरी व समकालीन या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलेले स्वरूप, आशय याविषयी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीच्या मराठी विभागप्रमुख डॉ. वर्षा चिखले यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पदव्युत्तर मराठी विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी काही निवडक कविताचे अभिवाचन केले. त्यात संत ज्ञानेश्वर, रघुनाथ पंडित, अनंत फंदी, सावित्रीबाई फुले, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, ना.धों. महानोर, यशवंत मनोहर, दया पवार, सुरेश भट, अरुण कोल्हटकर,मल्लिका अमर शेख यांच्या कवितांचे अभिवाचन अनुक्रमे अमृता राऊत, उज्ज्वला गुल्हाने, सारिका वनवे, पूजा अडोळे, डॉ.प्रणव कोलते, गणेश पोकळे, ऋषिकेश पाडर, अभिजित इंगळे, हेमंत सावळे, साक्षी धुळे आणि डॉ मोना चिमोटे यांनी केले.
याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल डॉ.वर्षा चिखले यांचा विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. चिखले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कवितांचे मानवी जीवनातील स्थान यावर भाष्य करून वाचन संस्कृती ही माणसाला जगायला शिकवते, चांगले साहित्य संस्कार घडवतात तसेच पुस्तकांशी मैत्री झाली तर वैचारिक बैठक तयार व्हायला मदत होते, असे सांगितले.
विदर्भ साहित्य संघाच्या शाखा अमरावतीच्या कार्यकारिणी सदस्य व भारतीय महाविद्यालय अमरावतीच्या मराठी विभागप्रमुख डॉ. मीता कांबळे यांनी पंधरवड्यादरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अभिजित इंगळे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला मराठी विभागातील प्राध्यापक डॉ.माधव पुटवाड, डॉ.प्रणव कोलते यांच्यासह विभागातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.