LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

कोस्टल रोड उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत, पण ‘या’ वेळेतच प्रवास करता येणार, ‘हे’ इंटरचेंजदेखील खुले होणार

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वरळी वांद्रे सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचे रविवारी म्हणजेच 26 जानेवारी 2025 रोजी लोकार्पण होणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर सोमवारी 27 जानेवारी पासून दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे. नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास अगदी सुस्साट होणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 9 मिनिटांत होणार आहे. 
   कोस्टल रोड आता नागरिकांसाठी पूर्ण खुला होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांसाठीदेखील तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार आहे. 
  मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून दिनांक १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो. 
या प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित दिशांकडे वाहतूक सुरू होणार आहे. 

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील दोन्ही टोक आता थेट जोडले गेले आहेत. त्यामुळं शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने आणि वांद्रे ते शामलदास गांधी मार्ग असा दक्षिण दिशेने म्हणजेच दुतर्फा प्रवास करणे शक्य झाले आहे.

बो आर्च स्ट्रिंग गर्डर (उत्तर वाहिनी मार्गिका) खुली केल्यानंतर खालील मार्ग वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

  • मरीन ड्राईव्हकडून मुंबई किनारी रस्ता मार्गे सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक ही लोकार्पण होत असलेल्या उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार आहे.
  • यापूर्वी मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक ही दक्षिण वाहिनी पुलावरून सुरू ठेवली होती. मात्र त्यासाठी आता उत्तर वाहिनी पूल उपलब्ध झाला आहे. परिणामी दक्षिण वाहिनी पुलाचा वापर नियमित दिशेने म्हणजेच वांद्रेकडून मरीन ड्राईव्हकडे येण्यासाठी करता येईल.
  • त्याचप्रमाणे मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे किनारी रस्या. वरून जाण्यासाठी बांधलेली आंतरमार्गिका देखील खुली होणार आहे. तसेच मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी वाहतूकही खुली होणार आहे. त्यामुळे लोअर परळ, वरळी नाका आणि लोटस् जंक्शनकडे जाणारी वाहतूक खुली होईल.
  • तसचे बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील खुली होणार आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!