LIVE STREAM

International NewsLatest News

शेती करण्यासाठी खासदारकीचा राजीनामा; माजी CMच्या विश्वासूनं राजकारण सोडलं; मोदी, शहांचे आभार

   नवी दिल्ली: एकीकडे निवडणूक जिंकण्यासाठी नेतेमंडळी हरतऱ्हेचे प्रयोग करत असताना राज्यसभेच्या एका खासदारानं शेती करण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खासदार विजयसाई रेड्डी वायएसआर काँग्रेसचे नेते आहेत. सक्रिय राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा त्यांनी आज केली. उद्या म्हणजेच २५ जानेवारीला ते राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते शेतीवर लक्ष केंद्रित करतील.
   वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांचे निकटवर्तीय अशी विजयसाई रेड्डी यांची ओळख आहे. आपण अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. माझा निर्णय वैयक्तिक असून माझ्यावर कोणताही दबाव नाही, असं रेड्डी यांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे. ६७ वर्षांच्या रेड्डी यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबातील असून ते सीए झालेले आहेत.
 विजयसाई रेड्डी आंध्र प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख आणि विश्वासार्ह चेहरा राहिले आहेत. वायएस जगन मोहन रेड्डी यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री वायअस राजशेखर रेड्डी यांचे ते निकटवर्तीय आणि विश्वासू नेते अशी त्यांची ओळख आहे. रेड्डी यांनी २०१६ मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून संसदीय कारकीर्द सुरु केली. संसदेच्या स्थायी समितीचे (परिवहन, पर्यटन आणि संस्कृती) ते अध्यक्ष राहिले आहेत. वायएसआर काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे.
 रेड्डी यांनी त्यांच्या संसदीय कारकिर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. 'मला ९ वर्षे प्रोत्साहन दिल्याबद्दल, मला ताकद आणि साहस दिल्याबद्दल आणि तेलुगु राज्यात मला ओळख दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे विशेष आभार मानतो,' असं रेड्डी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रेड्डी यांनी वायएसआर परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 'मी वायएसआर कुटुंबाचा ऋणी आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि ४ दशकं मला पाठिंबा दिला. जगन गारु यांचा मी कायम आभारी असेन. त्यांनी दोनवेळा मला राज्यसभेवर संधी दिली. मी भारतम्मा गारु यांनाही धन्यवाद देतो. त्यांनी मला इतकं मोठं स्थान दिलं,' अशा भावना रेड्डी यांनी व्यक्त केल्या आहेत. राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा करताना रेड्डींनी जगन मोहन यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!