Latest NewsMaharashtra
एसटी भाडेवाढीचे मंत्री भरत गोगावलेंकडून समर्थन, ‘चांगली सुविधा, गाड्या पाहिजे तर…’

महाराष्ट्रात सध्या एसटी भाडेवाढीचा विषय जोरात चर्चेत असून यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. एसटी बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडलाने वाहतूक सेवांच्या भाडेदरात 14.95 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. 25 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून राज्यभरात ही वाढ लागू झाली आहे. यावर प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना मंत्री भरत गोगावले यांनी या भाडेवाढीचे समर्थन केले आहे.
एस टी भाडेवाढीचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडून समर्थन करण्यात आले आहे. चांगली सुविधा, चांगल्या गाड्या आणि ड्रायव्हर कंडक्टर यांना पगारवाढीसाठी भाडेवाढ क्रमप्राप्त असल्याचे भरत गोगावले म्हणाले आहेत. एस टी प्रवास भाड्यात 15 टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली असून या भाडेवाढीचे समर्थन रोजगार हमी योजना भरत गोगावले यांनी केलं आहे.
चांगली सुविधा, चांगल्या गाड्या आणि ड्रायव्हर कंडक्टर यांच्या पगार वाढ पाहिजे असेल तर भाडेवाढ क्रमप्राप्त असल्याचे गोगावले म्हणाले आहेत. एसटी महामंडळ दर महिन्याला 50 कोटी रुपये तोट्यात आहे.गेल्या तीन वर्षात भाडेवाढ झाली नसल्याचा मुद्दा देखील गोगावले यांनी उपस्थित केला आहे.
महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्याने तसंच महागाई भत्त्यात वाढ झाल्याने आपोआप भाडेवाढ सुत्रानुसार उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी 1 जानेवारी 2025 रोजी परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
नवे दर कसे असतील?
एसटीमधून प्रवास करता प्रति टप्पा 6 किमीसाठी भाडं आकारलं जातं. साध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये आहे, ते आता 11 रुपये असेल. जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचंही भाडं सारखंच असेल. निम आरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील. शिवशाही (एसी) बसंच भाडं 12.35 वरुन 16 रुपये झालं आहे. तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) 17 रुपये मोजावे लागणार आहे. तसंच शिवनेरीचं (एसी) भाडं 18.50 ऐवजी 23 रुपये झालं आहे. तसंच शिवनेरी स्लिपरचं भाडं 28 रुपये आहे.