पोटच्या गोळ्याला व्हॉलीबॉल लागल्याने महिला संतापली; 14 वर्षांच्या मुलाला लाथा अन् बुक्यांनी तुडवलं, बदलापूरच्या हायफाय सोसायटीत धक्कादायक घटना

पुणे: बदलापुरात मुलं खेळत असताना मुलाला बॉल लागल्याच्या रागातून एका महिलेनं 14 वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापुरातील मोहन हायलँड सोसायटीतली ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या परप्रांतीय महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात सोसायटीत व्हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलाकडून आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून एका महिलेनं 14 वर्षीय मुलाला लथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरात उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीत राहणारा 14 वर्षीय मुलगा रविवार 19 जानेवारी रोजी सोसायटीत व्हॉलीबॉल खेळत होता. यावेळी तिथे खेळणाऱ्या एका 4 वर्षीय मुलाला त्यांचा बॉल लागला, त्यामुळे त्याच्या भावाने आईला बोलावलं. यानंतर या मुलाच्या आईने तिथे येत काहीही न विचारता 14 वर्षीय मुलाला थेट मारहाण सुरू केली. तिने अनेकदा त्याच्या कानशिलात लगावल्या, पोटात लाथा घातल्या, तसंच त्याचा गळा पकडून तुला मारून टाकीन, कापून टाकीन अशा धमक्या दिल्या. यावेळी अल्पवयीन मुलाची आज्जी त्याला सोडवायला मधे पडली असता तिलाही या महिलेने धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची माहिती मारहाण केलेल्या मुलाच्या आजीने दिली आहे.
दरम्यान, मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. यानंतर अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात पॉक्सो अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 352 सह अल्पवयीन न्याय कायदा 2015 च्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून महिलेच्या अटकेची तजवीज ठेवली असल्याचं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितलं आहे.