विहिरीत आढळला मायलेकीचा मृतदेह; ४ दिवसांपासून होत्या बेपत्ता, सिन्नरमधील घटनेनं खळबळ

सोनारी (साबरवाडी) येथील विवाहिता आणि तिच्या ९ महिन्याच्या मुलीचा मृतदेह घराजवळच काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळून आला. दोघी मायलेकी चार दिवसांपासून बेपत्ता होत्या. दरम्यान, सदर विवाहितेने बाळासह आत्महत्या केली, की हा घातपाताचा प्रकार आहे, या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र, माहेरच्या मंडळींनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.
पल्लवी संदीप बिन्नर आणि तिची ९ महिन्यांची मुलगी ज्ञानेश्वरी शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी भांडण झाल्यामुळे घरातून निघून गेल्या होत्या. शनिवारी तिच्या घरच्यांनी सिन्नर पोलिसांत दोघी मायलेकी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. मात्र, सोमवारी (दि.२७ ) सकाळी घरापासूनच काही अंतरावर असलेला एका विहिरीत पल्लवी बिन्नरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या संदर्भात सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पल्लवीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
गोविंद तुपे यांनी पाणबुडीच्या साह्याने विहिरीत पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर बाळाचा मृतदेह शोधून काढला. दरम्यान, सदर प्रकार हा घातपात असल्याचा संशय पल्लवीच्या माहेरकडील नातेवाइकांनी व्यक्त केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तणावाची स्थिती विचारात घेऊन लागलीच तिचा नवरा, सासू-सासरे यांना ताब्यात घेतले.