LIVE STREAM

Helth CareLatest News

गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्यादृष्टीने चिंतेचा विषय ठरत असलेल्या गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ पुण्यात या आजाराचे रुग्ण आढळत होते. परंतु, आता कोल्हापूरमध्येही दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी एक रुग्ण कर्नाटकातील कोगणोळी इथला तर दुसरा हुपरी येथील असल्याचे समजते. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, तरीही जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
सध्याच्या घडीला पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे सर्वाधिक 111 रुग्ण आहेत. यामध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोममुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. हा रूग्णदेखील पुण्यात राहणारा होता. मात्र, त्याचा मृत्यू सोलापूरमधील खासगी रुग्णालयात झाला होता. पु्ण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी यासंदर्भात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून केंद्र सरकारही अलर्ट झाले आहे. गेल्या आठ दिवसात या आजाराच्या रुग्णांची संख्या 100 पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सोमवारी सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.
बाधित जिल्ह्यांमध्ये सर्व्हे होणार
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महानगरपालिका युद्धपातळीवर कामाला लागली आहे. पुण्यात आता घरोघरी सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून आतापर्यंत तब्बल 25 हजार घरांमध्ये सर्व्हे पूर्ण झाला आहे. याशिवाय, हा आजार राज्यातील इतर भागात पसरु नये, यासाठी शीघ्र प्रतिसाद पथकांना बाधित भागाला भेट देऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या शौच आणि रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामधील काही सॅम्पल्समध्ये नोरो व्हायरस, कॅम्फेलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग आढळून आला आहे. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण दूषित पाणी असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील 80 टक्के रुग्ण हे नांदेड परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या परिसरातील आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!