LIVE STREAM

City CrimeLatest NewsVidarbh Samachar

बिबट्याच्या कातडीची तस्करी;आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत…

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत असलेल्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करतांना तीन आरोपींना अकोट तालुक्यातील जंगलातून पकडण्यात आले. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे येथील पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास करण्यासाठी आरोपींना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

   मेळघाटातील जंगलात बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्याचा प्रयत्न होत असल्याची गोपनीय माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून होते. पथकाने अकोटच्या जंगलात पाठलाग करून तीन आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक केली. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाचे पथकाने अकोला जिल्ह्यात येऊन तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत तीन व्यक्तींना पकडण्यात आले. त्यात दोन वाहक आणि एका मध्यस्थाचा समावेश आहे. त्यांच्याकडून साधारणतः सात ते आठ वर्ष वयोमान असलेल्या एका बिबट्याची ८०.५ इंच बाय २५ इंच आकाराची कातडी जप्त करण्यात आली.
 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या कातडीची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. आरोपींची दुचाकी (क्र. एम.एच.३० बीपी १०२८) देखील जप्त करण्यात आली. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का?, ही आंतरराष्ट्रीय टोळी की स्थानिक सराईत गुन्हेगार आहेत? बिबट्याची शिकार नेमकी केव्हा व कुठल्या जंगलात केल्या गेली, या दृष्टीने तपास केला जात आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेली कातडी आणि अटक करण्यात आलेले तीन आरोपी पुढील तपासासाठी अकोला जिल्हा वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे येथील पथकाला वन्यजीवाच्या कातडीची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई अकोला जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  कातडीची तस्करी करणे गंभीर गुन्हा

    वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार वन्य प्राण्यांची शिकार करून कातडी व वन्य प्राण्यांचे कोणत्याही अंगाची तस्करी केल्यास कठोर कारवाई होते. बिबट्या हा अधिनियमाच्या अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असून, बिबट्याच्या कातडीचा व्यापार, खरेदी-विक्री किंवा मालकी बाळगणे कठोरपणे प्रतिबंधित आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!