नवीन आचार्य पदवी संशोधन केंद्राला मान्यता द्या -डॉ. प्रशांत विघे

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुरेशी संशोधन केंद्रे नसल्यामुळे यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रात प्रवेश मिळू शकला नाही, ही बाब टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट च्या वतीने निवेदनाद्वारे विद्यापीठ प्रशासनाकडे मांडण्यात आली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये मार्च 2023 पासून नवीन संशोधन केंद्र आणि संशोधन केंद्राला वाढीव जागा देण्याबाबतचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
या अनुषंगाने ३ आणि ४ डिसेंबर २०२४ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये चर्चा झाली. सदर प्रस्ताव सादर केलेल्या संशोधन केंद्राला मान्यता का देण्यात आली नाही किंवा पीएच.डी संशोधन केंद्राचे प्रस्ताव का प्रलंबित आहेत, याविषयावर विविध अधिसभा सदस्य यांनी चर्चा केली. त्यानुसार १/२०१६ अध्यादेश विद्यापीठात लागू असेल तर त्यानुसार हे प्रस्ताव थांबवण्याचा कोणताही अधिकार कार्यालयाला असत नाही. जोपर्यंत नवीन कायदा १/ २०२२ अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत १/२०१६ नुसार तात्काळ कार्यवाही करावी आणि अशा स्वरूपाचा निर्णय अधिसभेमध्ये घेण्यात आलेला आहे.
तत्पुर्वी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने फी वाढीच्या संदर्भातील क्र.१५७/२०२४ आचार्य पदवी संशोधन केंद्र शुल्काबाबत अधिष्ठाता मंडळाने दि. १०.०६.२०२४ च्या सभेमध्ये विषय क्र. ३९ नुसार केलेल्या शिफारशीममध्ये सदर प्रस्ताव शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून लागू करण्याचा विद्या परिषदेने निर्णय घेतलेला आहे.
अधिसभा संपन्न होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होते आहेत,तरीही प्रस्ताव प्रलंबित आहेत.
उपरोक्त विषयाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी चौकशी केली असता , प्रक्रिया सुरू आहे, तज्ञ समितीचे नाव येत आहे, लवकरच संशोधन केंद्राला भेटी देण्यात येईल अशा आशयाचे उत्तर विद्यापीठाच्या कार्यालयातून मिळत आहेत .
त्यामुळे प्रस्ताव सादर केलेल्या संशोधन केंद्राला भेटी देऊन मान्यता प्रक्रिया सुरू करावी, तसेच ज्या आचार्य पदवी संशोधकांनी संशोधक विद्यार्थी संख्या वाढीबाबत मागणी केली असेल, त्यांना संशोधक विद्यार्थी संख्या वाढवून मिळावी, अशी विनंती निवेदनाद्वारे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांना टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे निमंत्रक तथा नुटाचे अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत विघे यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.