मेहुण्याच्या दहाव्याला गेले अन् घरफोडी झाली, आयुष्यभर कमवलेलं ७० तोळे सोनं काही तासात लंपास

शारदा तालुक्यातील टेंभी बुद्रुक येथे गावाच्या मध्यभागी असलेल्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत ७० तोळे दागिन्यांसह, रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. घरमालक मेहुण्यांच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. या परिसरात पंधरा दिवसांत ही पाचवी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
उत्तर कार्यासाठी गेले होते
शहादा तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथील शेतकरी इंद्रसिंग भिलेसिंग गिरासे, हे नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे आपल्या मेहुण्यांच्या उत्तर कार्यासाठी गेले होते. सोमवारी संध्याकाळी त्यांचे लहान चिरंजीव घर बंद करून दोंडाईचा येथील आपल्या रूमवर निघून गेले. त्याच मंगळवारी दिनांक २७ जानेवारीच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वरच्या व खालच्या मजल्यावर असलेले गोदरेज कपाट तोडून जवळपास ६० ते ७० तोळे सोने आणि दीड ते दोन लाख रुपये रोख रक्कम लंपास केले.
कशी झाली चोरी?
इंद्रसिंग गिरासे यांच्या शेजारीच राहणाऱ्या ताराबाई भरतसिंग गिरासे यांच्या कानावर शेजारी घरात काहीतरी लोखंडी वस्तूंचा आवाज येत असल्याची माहिती राहुल गिरासे यांना दिली. राहुल गिरासे यांनी किशोर गिरासे यांना इंद्रसिंग गिरासे यांच्या घरात काहीतरी आवाज येत आहे, आपण पाहणी करावी अशी मोबाईलवर माहिती दिली. यावरून किशोर गिरासे आणि त्यांचे वडील राजेंद्र गिरासे यांनी खिडकी उघडून पाहिले असता समोरच्या घरात दोन ते तीन व्यक्ती उभे असून, ते काहीतरी चोरीच्या इराद्याने आले असावेत असा संशय त्यांना आला. त्यांनी मागच्या दरवाजाने जाऊन गल्लीतील इतरांना जागे करत घराकडे धाव घेतली. मात्र चोरटे ७० तोळे सोने, दोन लाख रुपये रोकड घेऊन तिथून तापी नदीच्या दिशेने पसार झाले.
पंधरा दिवसांत पाच चोरीच्या घटना
इंद्रसिंग गिरासे यांनी याबाबत घटनेची माहिती सारंगखेडा पोलीस स्टेशनला कळवली. फॉरेन्सिक पथक व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. व तज्ञांनी ठशांचे नमुने घेतले. चोरी झालेल्या घरापासून शेजारी तापी नदी पात्रापर्यंत श्वानपथकाने शोधले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी भेट दिली. सारंगखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. फॉरेन्सिक पथकात पोलीस हे कॉ संजय रामोळे, स्वानपथकात दिलीप गावित, देविदास नाईक , पी ए साठे आदींसह कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती. या परिसरात पंधरा दिवसांत पाच चोरीच्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.