LIVE STREAM

Amaravti GraminCrime NewsLatest News

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्याची लोखंडी सळाखीने हत्‍या; आरोपीला अटक

‘अमरावती : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्याची डोक्यावर लोखंडी सळाखीने प्रहार करून हत्‍या करण्यात आली. हत्येनंतर अपघाताचा बनाव रचण्यात आला. मात्र, पोलिसांनी काही तासांतच या हत्याकांडाचा उलगडा करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही घटना तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मनोज वामनराव नागापुरे (४०) रा. तळेगाव दशासर असे मृत इसमाचे तर उमेश शिवा शिंदे (२७) रा. तळेगाव दशासर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निमगव्हाण फाट्याजवळ दुचाकी क्रमांक एचएच २७ सीआर ३७५० वर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती तळेगाव दशासर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चौकशीत मृत इसमाची ओळख पटली. मनोज नागापुरे यांच्‍यावर अज्ञात हल्‍लेखोराने डोक्यावर जड वस्तूने जबर प्रहार करुन त्यांची हत्‍या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी मनोज यांचे भाऊ सुनील यांच्या तक्रारीवरून हत्‍येचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला. तपासात ही हत्‍या गावातीलच रहिवासी उमेश शिंदे याने केल्याचे समोर आल्यावर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
उमेश शिंदे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधात मनोज नागापुरे हे अडसर ठरत होते. त्यामुळे उमेश शिंदे याने त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने मनोज नागापुरे यांना रात्री दारू पिण्याच्या बहाण्याने आपल्या शेतात नेले. तेथे बेसावध क्षणी उमेश शिंदे याने मनोज नागापुरे यांच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने प्रहार करून त्यांची हत्‍या केली. त्यानंतर त्याने दुचाकीसह मनोज नागापुरे यांना रस्त्याच्या कडेला आणून टाकून अपघाताचा बनाव रचला, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यानुसार पोलिसांनी उमेश शिंदे याला अटक केली. आरोपीने अपघाताचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, पोलीस चौकशीतून उमेश शिंदे यानेच ही हत्‍या केल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्‍याने आरोपी उमेश शिंदे याने मनोज नागापुरे याला संपविल्‍याचे उघडकीस आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम, सागर हटवार व मुलचंद भांबुरकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!