AmravatiLatest News
‘नंददीप’च्या सेवाकार्यास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कायम सहकार्य कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांची ग्वाही

यवतमाळ येथील नंददीप फाऊंडेशन बेघर मनोरूग्णांसाठी करत असलेले सेवाकार्य अलौकीक आहे. संत गाडगेबाबांच्या सेवेचा वसा नंददीपचे संदीप व नंदिनी शिंदे दाम्पत्य चालवित आहे. त्यांच्या सेवाकार्यास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कायमच सहकार्य राहील, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी दिली.
स्थानिक नंददीप फाऊंडेशनद्वारे संचालित बेघर, मनोरूग्ण निवारा केंद्रास कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी आज गुरूवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नंददीपचे कार्य कसे चालते, ते समजून घेतले. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर आदी उपस्थित होते. कुलगुरूंनी निवारा केंद्राची पाहणी करून अनेक मनोरूग्णांशी संवाद साधला. यावेळी येथील रूग्ण सीमा हिने कुलगुरूंशी इंग्रजीत संवाद साधून आपल्याला पुढे शिकायचे असल्याचे सांगितले. तर वाल्मिक नावाच्या अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या युवकाने अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय काम करायचे असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे संपूर्ण रेकॉर्ड कसे हाताळले जाते, याची माहिती सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र पवार यांनी दिली. येथे रूग्णांवर होत असलेल्या संगीत उपचार पद्धतीचा सकारात्मक फायदा होत असल्याचे त्यांनी कुलगुरूंना सांगितले. निवारा केंद्रात असलेल्या व आतापर्यंत दाखल होवून परत गेलेल्या ७०० वर रूग्णांचे संपूर्ण रेकॉर्ड संस्थेने दिवसनिहाय जतन करून ठेवल्याचे बघून, कुलगुरू डॉ. बारहाते यांनी या कामाचे कौतुक केले. यावेळी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी संदीप व नंदिनी शिंदे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तर संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार नितीन पखाले यांनी ‘डेबू ते गाडगेबाबा’ हे पुस्तक कुलगुरू व मान्यवरांना भेट दिले. निवारा केंद्रात नियमितपणे मदतीसाठी येवून मनोरूग्णांची काळजी घेणाऱ्या लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींचा कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. संत गाडगेबाबा समाजकार्य पुरस्कार सोहळ्यात नंददीपला एक लाख रूपयांची मदत जाहीर करणाऱ्या ऑस्ट्रलियातील पौर्णिमा गडलिंगे (कुळकर्णी) यांनी ही मदत संस्थेस दिल्याने नंददीपच्या वतीने त्यांचे विशेष आभार यावेळी मानण्यात आले. विद्यापीठाच्या कार्यक्रमामुळे नंददीपला थेट विदेशातून मदत मिळाल्याचे यावेळी अनंत कौलगीकर यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रा. घनश्याम दरणे, डॉ. निखीलेश नलोडे, नितीन पखाले, भगवान भितकर, प्रा. संतोष गोरे, प्रा. ममता दयने, प्रा. कविता तातेड, प्रा. शैलेंद्र तेलंग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निशांत सायरे यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.