LPG पासून ते UPI पर्यंत… आजपासून ‘हे’ बदल लागू, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
आजपासून २०२५ सालचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी सुरू झाला आहे. पैशाशी संबंधित कामांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर होणार आहे. तसेच, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा होऊ शकतात.
एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घट…
१ फेब्रुवारीपासून देशात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ७ रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे, आजपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १९ किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत १७९७ रुपये झाली आहे. यापूर्वी हे १८०४ रुपयांना मिळत होते. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
यूपीआय नियमांमध्ये बदल…
यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही यूपीआय व्यवहार ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे नियम आजपासून होणार आहेत. NPCI च्या नव्या नियमानुसार, १ फेब्रुवारीपासून स्पेशल कॅरेक्टरसह तयार करण्यात आलेल्या आयडीद्वारे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत.तर ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स अक्षरं आणि अंक वापरले जातील.
कोटक महिंद्रा बँकेच्या नियमात बदल…
कोटक महिंद्रा बँकेने १ फेब्रुवारी २०२५ पासून आपल्या सामान्य फीचर्स आणि शुल्कांमध्ये बदल लागू केले आहेत. हे बदल मोफत एटीएम व्यवहार मर्यादा, डिमांड ड्राफ्ट, आरटीजीएस, आयएमपीएस, चेकबुक इत्यादी बँकिंग सेवांशी संबंधित आहेत.