परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
अमरावती :- सर्वसामान्य नागरिकांना घर विकत घेताना म्हाडा सर्वात चांगला पर्याय असतो. त्यामुळे नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज म्हाडाच्या अमरावती विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री. देशमुख, श्री. सोनवणे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, म्हाडाने आतापर्यंत 18 हजार घरे दिली आहेत. प्रत्येकाला हक्काचे घर मिळवून देण्याचे प्रधानमंत्री यांनी उद्देश ठेवला आहे. यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहे. त्यामुळे म्हाडाने गतीने नियोजन करावे. तसेच प्रत्येक प्रकल्पाचा पाठपुरावा करून पूर्णत्वास न्यावा. अमरावती विभागात म्हाडाची घरे बांधण्यासाठी पुरेसा वाव आहे. त्यामुळे सक्षम नियोजन करून, तसेच आवश्यकता भासल्यास खाजगी भागीदारीतून प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत. विकासकांना माहिती व्हावी यासाठी त्यांची बैठक घेण्यात यावी. त्यांना सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत माहिती देण्यात यावी. जनजागृतीसाठी मिळावे घेण्यात यावे.
कर्मचारी संघटनांना माहिती दिल्यास त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तसेच लाभार्थी ही वाढतील. घरांची संख्या वाढवण्यासाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध होत असल्यास ती घेण्यात यावी. यामुळे नागरिकांना स्वस्तात घरे मिळू शकतील. नागरिकांना परवडणारी घरे मिळावी, यासाठी दरवर्षी किमान तीन हजार घरांची नियोजन करावे. यासाठी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.