9 वर्षांच्या मुलीला शाळेच्या मैदानात खेळताना निर्जनस्थळी घेऊन गेला, अज्ञातानं इंजेक्शन दिल्याचं कळताच..

मुंबई :- मुंबईतील भांडुपमध्ये एका 9 वर्षीय शाळकरी मुलीला अज्ञात व्यक्तीने शाळेच्या मैदानातून निर्जनस्थळी नेत इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .भांडुपच्या एका नामांकित शाळेत ही मुलगी शिकत असून 31 जानेवारीला ती शाळेच्या मैदानात खेळत होती .शाळेच्या मैदानात खेळताना एका अज्ञात व्यक्तीने गाठत तिला शाळा परिसरातीलच निर्जनस्थळी नेत इंजेक्शन दिल्याचं मुलीनं सांगितलंनंतर पालकांच्या हृदयाचा ठोका चुकला .घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकांनी तातडीने मुलीला उपचारासाठी जवळील रुग्णालयात तपासणीसाठी नेलं .भांडुप पोलिसां संपर्क साधत घटनेची कल्पना दिली .या प्रकरणाची दखल घेत भांडुप पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथक नेमली आहेत .पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली .दरम्यान या घटनेने पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
देशभरात वाढत्या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण, अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची वृत्त वारंवार कानावर पडत असतानाच भांडुपमध्ये धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. आता शाळेततरी आपल्या मुली सुरक्षित आहेत की नाही? असा विचार पालकांच्या मनात येऊ लागला आहे.
नक्की घडले काय?
भांडुपमधील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणारी ही मुलगी 31 जानेवारी रोजी शाळेच्या मैदानात खेळत होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिला गाठले आणि शाळा परिसरातील निर्जनस्थळी नेले. काही वेळानंतर मुलगी वर्गात परतली, मात्र तिला एका व्यक्तीने इंजेक्शन दिल्याचे तिने सांगितल्याने खळबळ उडाली. पालकांना या प्रकाराबद्दल कळल्याबरोबर पालकांनी तातडीने मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले आणि भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी 4 पथके नेमली आहेत. शाळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र सीसीटीव्हीमध्ये काहीही आढळले नसल्याचे सांगण्यात आले. या फुटेजमध्ये मुलगी शाळेच्या मैदानात खेळताना आणि त्यानंतर वर्गात मित्र-मैत्रिणींसोबत खेळताना दिसते. यात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्या नाहीत. दरम्यान, मुलीची रक्तचाचणी, एक्स-रेसह सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून, प्राथमिक अहवालानुसार सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
भांडुप पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांचे जबाब नोंदवले जात आहेत. या संपूर्ण घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी पालकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.