“रथसप्तमी महोत्सवाचा दिंडी-पालखी सोहळ्याने भव्य समारोप, भक्ती आणि समाजसेवेचा अनोखा संगम”

“धर्म, भक्ती, एकता आणि समाजसेवेचा मिलाफ म्हणजेच वडाळी येथे इंद्रशेष दरबार संस्थांद्वारे आयोजित रथसप्तमी महोत्सव! आज या महोत्सवाचा दिंडी-पालखी सोहळ्याने थाटात समारोप झाला. या सोहळ्यात वारकरी भजनी मंडळ, कीर्तन, धार्मिक अनुष्ठान आणि विविध सामाजिक उपक्रमांचा सहभाग दिसून आला. चला, जाणून घेऊ या महोत्सवाचे खास क्षण.”
वडाळी येथील इंद्रशेष दरबार संस्थांच्या वतीने आयोजित रथसप्तमी महोत्सव व भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचा आज दिंडी आणि पालखी सोहळ्याने समारोप झाला. मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्यात ५० हून अधिक वारकरी मंडळे आणि दिंडी पथकांनी सहभाग घेतला.
गेल्या सात दिवसांपासून चाललेल्या या धार्मिक महोत्सवात ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या प्रवचनांनी वातावरण भारावले होते. समारोपाच्या दिवशी, त्यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन पार पडले आणि परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
सतत सात दिवस चाललेल्या या महोत्सवात केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचीही रेलचेल होती.
१ फेब्रुवारीला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे, अनेक जोडपीही रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावली.
२ फेब्रुवारीला गरजूंसाठी वस्त्रदानाचा उपक्रम राबवला गेला.
३ फेब्रुवारीला वृक्षप्रेमींना विविध प्रजातींच्या झाडांचे वाटप करण्यात आले.
आजच्या दिंडी आणि पालखी सोहळ्याने महोत्सवाला एक वेगळेच रंगतदार वळण दिले. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी फुलांचा वर्षाव, पूजन आणि स्वागत केले.पालखी सोहळ्याचे नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष राजेश बोके व व्यवस्थापक प्राध्यापक हरिदास खुळे यांनी केले. भक्तीचा जागर आणि समाजसेवेच्या व्रताने वडाळी परिसर भक्तिरसात न्हावून निघाला.
“रथसप्तमी महोत्सव हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक प्रेरणादायी महोत्सव ठरला. वारकरी परंपरेचा वारसा आणि समाजहिताच्या उपक्रमांचा मिलाफ येथे अनुभवायला मिळाला. अशाच भक्तीमय आणि प्रेरणादायी घडामोडींसाठी बघत रहा – सिटी न्यूज!”