“अक्षय शिंदे प्रकरणात आईचा मोठा खुलासा; कोर्टात सांगितलं ‘आम्हाला…”

बदलापूर :- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आम्हाला केस लढायची नसल्याचं अक्षयच्या कुटुंबीयांनी कोर्टात सांगितलं आहे. आम्हाला लोकांकडून फार त्रास होत आहे. आम्हाला धावपळ करायला जमणार नाही असं त्यांनी कोर्टात सांगितलं आहे. दरम्यान कोर्टाने यावेळी त्यांना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? अशी विचारणाही केली. न्यायालय याप्रकरणी उद्या निर्णय देणार आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबरला एन्काऊंटर करण्यात आला होता. यानंतर अक्षयच्या आई वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु असताना अक्षयच्या आई-वडिलांनी आपल्याला केस लढायची नसल्याचं म्हटलं आहे.
अक्षय शिंदेची आई अलका अण्णा शिंदे यांनी कोर्टात बोलण्याची परवानगी मागितली होती. यानंतर कोर्ट रुममधून सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी त्यांनी आम्हाला केस लढायची नाही असं सांगितलं. अण्णा शिंदे यांनीही तीच मागणी केली. लोकांचा खूप त्रास होत आहे. आम्हाला धावपळ जमणार नाही. आमला मुलगा गेला आहे असं त्यांनी सांगितलं. यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्यांना तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? असं विचारलं. त्यावर त्यांनी आमच्यावर कुणाचा दबाव नाही असं उत्तर दिलं.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांनी त्यांना दिलासा द्यायचा प्रयत्नही केला. कोर्ट आता यावर उद्या निर्णय देणार आहे.
अक्षय शिंदेंच्या वतीने कोर्टात लढा देणारे वकील अमित कटारनवरे यांनी सांगितलं की, “ते काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. कायदा काय म्हणतो तो महत्त्वाचं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं तर कोणताही श्रीमंत गरिबाला मारेल. नंतर कोर्टासमोर येऊन केस चालवायची नाही सांगितलं तर हा पायंडा श्रीमंत गरिबांना मारु शकतात याचा परवाना देईल. तो पायंडा पडू नये इतकी माफक कोर्टाकडून अपेक्षा आहे”. हे प्रकरण बंद होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.