भाजपचा विजय अन् अजित दादांच्या राष्ट्रवादीचं डिपॉझिट जप्त, दिल्ली निवडणुकीचा असाही निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. पक्षाने 23 उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यापैकी सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठी नामुष्की ओढावली आहे.
नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील आपलं नशिब आजमवलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल 23 उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. पण त्यापैकी सर्वांचा दारुण पराभव झाला आहे. या उमेदवारांचा फक्त पराभव झाला नाही तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिल्लीत केवळ 0.03 टक्के मतेच मिळाली आहेत.
अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुरारी, बादली, रिठाला, मंगल पुरी, शालिमार बाग, चांदणी चौक, मातिआ महल, बाली मारान, मोती नगर, मदीपूर, हरी नगर, जनकपुरी, विकासपुरी, नवी दिल्ली, कस्तुरबा नगर, मालविआ नगर, छतरपूर, दिओली, संगम विहार, कालकजी, तुघलकाबाद, बादरपूर, लक्ष्मी नगर, क्रिष्णा नगर, शाहदरा, सीमा पुरी, रोहतास नगर, घोंडा, गोकालपूर, कारावाल नगर या अशा एकूण 23 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार दिले होते. पण या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. सर्व 23 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
राष्ट्रवादीला अपयश, पक्षाला राष्ट्रीय दर्जा नाहीच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या राष्ट्रीय दर्जा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय दर्जासाठीच्या निकषात बसत नसल्याने आयोगाने त्यांचा तो दर्जा काढून घेतला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो दर्जा मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुणाचल निवडणुकीत अनेक उमेदवार जिंकून आले आहेत. यानंतर राष्ट्रवादीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपलं नशिब आजमावलं. पण इथे त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जासाठी आता आणखी काही काळाची वाट पाहावी लागणार आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी प्रचारसभा घेतल्या, पण…
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात महायुतीचा एक प्रमुख घटक पक्ष आहे. पण तरीही त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक ही भाजपच्या विरोधात लढवली. अजित पवार हे स्व: प्रचाराला जातील, अशी चर्चा होती. पण तसं झालं नाही. दिल्ली निवडणुकीची सर्व जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांनी सांभाळली. त्यांनी दिल्लीत रोड-शो घेतले, तसेच प्रचारभाही घेतल्या. पण त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं.