AmravatiCity CrimeLatest News
ई सिगारेट विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई, टेक्सस स्मोक शॉपमधून 3 लाख रुपयांचे प्रतिबंधित ई सिगारेट जप्त

अमरावती शहरात पोलीस आयुक्तालयात प्रतिबंधीत "ई सिगारेट" आणि हुक्काच्या साहित्याची विक्री करणाऱ्या एका दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्त श्री. नविनचंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून सी.आय.यु. पथकाने पेट्रोलिंग सुरू केले. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, टेक्सास कॅम्प रोडवरील एका दुकानात प्रतिबंधीत "ई सिगारेट (वेप)" आणि हुक्का साहित्य विकले जात आहे.
त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ त्या ठिकाणी धडक देत दुकानाची पाहणी केली. तेथे दुकान मालक आशिष बाबाराव कडु, वय ३८ वर्ष, रा. अर्जुन नगर, अमरावती याच्या दुकानात ५५ नग 'ई सिगारेट' जप्त केले. ही सर्व 'ई सिगारेट्स' तंबाखुयुक्त फ्लेवर्डसह इम्पोर्टेड असून, याची एकूण किंमत ३,००,००० रुपये होती. हे 'ई सिगारेट्स' शासनाने प्रतिबंधित केलेले होते. दुकानदाराशी विचारपुस केल्यानंतर, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करत "प्रोहीबीशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट अॅक्ट २०१९" अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्त श्री. नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त श्री. गणेश शिंदे आणि पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सी.आय.यु. पथकाच्या प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, स.पो.नि. मनोज मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यवाहीत भाग घेतला. हे प्रकरण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, आणि पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधीत साहित्याची विक्री करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई केली आहे. या कारवाईची पूढील तपास सुरु असून आणि आरोपीविरूद्ध योग्य कारवाई केली जाणार असल्यांची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.