LIVE STREAM

Latest News

‘केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…’, संजय राऊत स्पष्टच बोलले, ‘देशाच्या जनतेने तुम्हाला…’

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सर्वांनी घेणं गरजेचं आहे असं मत मांडलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून, आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. भाजपाने 48 तर आम आदमी पक्षाने 22 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सर्वांनी घेणं गरजेचं आहे असं मत मांडलं आहे. तसंच भाजपावर टीका केली असून, विजयाचा हँगओव्हर झाला असून हा अहंकर आहे अशा शब्दांत निशाणा साधला.

“लोकशाहीत निवडणुका होत असतात. निवडणुकीत विजय पराभव, हार जीत होत असते. पण गेल्या 10 वर्षात भाजपा निवडणुकीत उरतल्यापासून, ते आताचा भाजपा या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाहीत, त्या शैतानी किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जात आहेत. आम्हाला जिंकायचंच आहे, आम्हाला हरवायचंच आहे, आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचा आहे अशा प्रकारे ते लढत आहेत. यासाठी साम, दाम, दंड, भेद, अर्थ सगळ्या गोष्टींचा वापर केल जात आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“मतदार यादीतील घोटाळा जो महाराष्ट्रात पाहिला तोच दिल्ली, हरियाणा, बिहारमध्ये दिसत आहे. पण या सगळ्याचा आता बाऊ न करता पुढील लढाईसाठी आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे हा जनतेने दिलेला संदेश आहे. महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीने जो निकाल दिला आहे त्यातून, काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता हे आकडे सांगत आहेत. आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सर्वांनी घेणं गरजेचं आहे. अन्यथा केंद्रात किंवा राज्यात जे एकतर्फी सुरु आहे त्याला मान्यता द्यायला हवी. देश, लोकशाही टिकेल का? विरोधी पक्षाचा आवाज राहिला का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे,” अशी खंत त्यांनी मांडली आहे.

संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवरही टीका केली. “अण्णा हजारे काय म्हणतात त्याला अर्थ नाही. अण्णा हजारे अचानक जागे होतात. मोदी काळात किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे, भ्रष्टाचार झाला, लोकशाहीवर हल्ले झाले तेव्हा आमच्या अण्णा हजारेंनी हालचाल केली नाही. पण दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याने त्यांना आनंद झाला आहे, हे दु:खद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तो लोकशाहीला मारक आहे. दोघांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं, त्यामुळेच अण्णा देशाला माहिती झाले. पण गेल्या 12 वर्षात देशावर अनेक संकटं आली, देश लुटला, विकला जात आहे. एकाच उद्योगपतीच्या घशात देशातील संपत्ती घातली जात आहे. भ्रष्टाचारांना भाजपात पवित्र करुन घेतलं जात आहे. अण्णांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज भाजपात आहेत. अण्णा हजारेंना त्यावर आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही. त्यामागील रहस्य काय? अण्णा हजारेंना किंवा काँग्रेसला आनंद झाला असेल तर मला याचं दुख वाटतं. केजरीवाल हरले असले तरी नरेंद्र मोदी, आमित शाह, भाजपा विजयी झाले आहेत. ज्यांनी या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणला आहे”.

“आम्ही खुर्चासाठी लढत आहोत तर मग तुम्ही कशासाठी लढत होतात? महाराष्ट्रातील सरकार येड्यांची जत्रा आहे. विजयाचा हँगओव्हर झाला असून हा अहंकर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने बोललं पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची गेल्यावर तुमचा चेहरा कसा पडला होता आणि निराश होता हे आम्ही पाहिलं होतं. तसंच मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री कसे रुसून बसलेले आहात हे आम्ही पाहत आहे. खुर्चीची लढाई तुम्ही सुरु केली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!