मॉर्निंग वॉकदरम्यान मागून बस आली अन् घडले भयानक; तरुणाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

चिखली- बुलढाणा रोडवरील सवना फाटानजीक येथे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. चिखलीहून जळगावकडे जाणारी एसटी बस भरधाव वेगाने जात असताना सवना फाट्याजवळ हा अपघात घडला
बुलढाणा :
पहाटेच्या सुमारास चिखली- बुलढाणा मार्गावर भयानक घटना घडली आहे. या रस्त्याने सकाळी अनेक जण मॉर्निंग वॉकला जात असतात. अशाच प्रकारे मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. रस्त्याच्या कडेने चालत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या बसने दोन जणांना जोरदार धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी आहे.
चिखली- बुलढाणा रोडवरील सवना फाटानजीक येथे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. चिखलीहून जळगावकडे जाणारी एसटी बस भरधाव वेगाने जात असताना सवना फाट्याजवळ हा अपघात घडला. या घटनेत आलोक शामलाल शिंगणे (वय ३०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी घडलेल्या या घटनेमुळे या मार्गावरील अन्य नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. हे दृश्य पाहून काहीच थरकाप उडाला होता.
दरम्यान बुलढाणा शहरातील अनेक नागरिक चिखली- बुलढाणा मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. यात आलोक हा देखील रोज फिरण्यासाठी जात होता. त्यानुसार आज देखील आपल्या मित्रांसोबत सकाळी फिरण्यासाठी निघाला होता. नेहमीप्रमाणे अनेकजण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यात आलोक हा त्याच्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेला होता. याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या बसने दोन युवकांना पाठीमागून जोरदार धडक देत उडविले.
मॉर्निग वॉकला गेला तो परतलाच नाही
मागून भरधाव वेगाने आलेल्या बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आलोक शामलाल शिंगणे याचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय रमेश पट्टे (वय २६) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिखलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत बस ताब्यात घेतली आहे.