स्कूलबस अपघातानंतर काँग्रेसची मागणी

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्कूलबस अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अपघातात १३ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. यावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत तहसीलदार मार्फत परिवहन विभागाकडे तपासणीची मागणी केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील एका शाळेच्या स्कूलबसला झालेल्या अपघातात तब्बल १३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, काँग्रेस पक्षाने प्रशासनाला त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांच्या स्कूलबस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, बस व अन्य वाहनांच्या स्ट्रक्चरल स्थितीची तपासणी करून सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिवहन विभाग, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी यावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अपघातानंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी केली जाईल का? प्रशासन आणि परिवहन विभाग यावर काय भूमिका घेतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी योग्य ती पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष राहील.