LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

मेळघाट व्याघ्र प्रकल्प: आदिवासी महिलांसाठी वातनिर्मितीतून रोजगाराच्या नव्या संधी

अमरावती :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्यजीव विभागातील दोन गावे आणि मेळघाट वन्यजीव विभागातील चार गावांतील स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार मिळावा यासाठी वातनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिलांच्या सक्षमीकरण आणि उन्नतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कार्य

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य काम वन आणि वन्यजीव यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आहे. त्याचबरोबर स्थानिक लोकांच्या विकासासाठीही मेळघाट व्याघ्र प्रकल्प नेहमीच प्रयत्नशील असतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, अमरावती यांच्या प्रयत्नातून गेल्या चार ते पाच वर्षांपासून मेळघाट क्षेत्रातील युवक-युवतींसाठी रोजगार निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. व्यावसायिक वाहनांचे वाटप, मेळघाट कौशल्य प्रशिक्षण केंद्र, संगणक प्रशिक्षण केंद्र आणि शिलाई मशीन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे दोन हजार नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

वातनिर्मिती प्रकल्पाचा उद्देश

रोजगार निर्मितीची ही प्रक्रिया पुढे चालू ठेवत मेळघाट क्षेत्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वातनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
वातनिर्मिती प्रशिक्षण आणि साहित्य वाटप

मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती आणि गडचिरोली अगरबत्ती प्रकल्प (GAP) यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट वन्यजीव विभागातील शहानूर व मलकापूर तसेच मेळघाट वन्यजीव विभागातील वस्तापूर, रामटेक, मलकापूर व सोमवारखेडा अशा सहा गावांतील १२० महिला व युवतींना स्थायी रोजगाराच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर वातनिर्मितीचे प्रशिक्षण तसेच आवश्यक साहित्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमातून व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील ५०० स्थानिक महिलांना स्थायी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

उत्पादन आणि उत्पन्न

वातनिर्मितीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला साधारणपणे ३५० ते ४०० रुपये प्रतिदिन मिळकत होत आहे. तयार मालाचे विपणन गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाद्वारे केले जात आहे.

प्रकल्पाचे फायदे

या उपक्रमातून स्थानिक आदिवासी महिलांना आर्थिक पाठबळ मिळत आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे. तसेच, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची वनावरील निर्भरता कमी होऊन स्थानिक नागरिक वन संवर्धनामध्येही सहभागी होत आहेत.

प्रकल्पातील सहभाग

वातनिर्मिती प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट वन्यजीव विभाग, गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट वन्यजीव विभाग, वन्यजीव व संशोधन आणि उपजीविका तज्ज्ञ, मेळघाट व्याघ्र प्रकल्प तसेच क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

मेळघाट क्षेत्र स्वयंपूर्ण करण्यासाठी येथील महिला आत्मनिर्भरतेने आणि आत्मविश्वासाने कार्य करीत आहेत. या स्वयंसिद्ध महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून आपणही त्यांच्या आनंदात सहभागी होऊया!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!