उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट!

नांदेड :- उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. भोकर तालुक्यातील पोमनाळा गावात नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही अंतरावर असलेल्या विहिरीवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी गर्दी करत आहेत. महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे. दूषित पाणी पिण्यामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा गावात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावकऱ्यांना रोजच्याच गरजांसाठीही कोसोंदूर जाऊन पाणी आणावे लागत आहे. काही नागरिक दुचाकी, बैलगाड्यांवर टाक्या बांधून पाणी भरून आणत आहेत. पण काही वेळा शेतकरी पाणी द्यायला तयार नसल्याने नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागतो.
या गावाचा पाणीटंचाईचा प्रश्न आजचा नाही, तर अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, याकडे प्रशासन, आमदार, खासदार कोणीही लक्ष दिले नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. आता तरी आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी लक्ष घालावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
गावात पाणी मिळत नसल्याने स्थानिक लोक मोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत. कामगारांना रोजंदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘एक दिवस काम, एक दिवस पाणी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गावात पाणी उपलब्ध नाही म्हणून येथे मुली देण्यास कोणीही तयार नाही, असे बोलले जात आहे.
महिला ग्रामस्थ नागरिक – “आम्हाला रोजचं पाणी मिळत नाही. विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागतं. प्रशासनाने तरी आम्हाला मदत करावी.” – बाईट
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पोमनाळा गावातील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे या समस्येचा सामना करावा लागत आहे. आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.