शूट आऊट अॅट मावळ! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी

पुणे :- मावळच्या देहूरोडमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. देहूरोडच्या गांधीनगरमध्ये ही घटना घडली आहे. सर्वजण वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एन्जॉय करत होते त्याचवेळी अचानक गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे मावळमध्ये खळबळ उडाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळमधील देहूरोडच्या गांधीनगर परिसरात बर्थडे पार्टीमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. जुन्या भांडणाच्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्यांना देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नंदकिशोर यादव याच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. गोळीबार केलेल्या आरोपींचा शोध सध्या देहूरोड पोलिस घेत आहेत.या घटनेमुळे मावळमध्ये खळबळ उडाली आहे.
घडलं असं की, वाढदिवसाची पार्टी सुरू असताना त्याठिकाणी मंडपाच्या शेजारी असलेल्या रोडच्या बाजूला काही वाहनांचे पार्किंग केले होते. इथे एका तरुणाने याठिकाणी वाहनं का पार्किंग केली असा सवाल वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आलेल्या लोकांना केला. यावेळी त्यांच्यामध्ये शिवीगाळ झाले. तो तरुण संतप्त होत पार्टीतून बाहेर गेला आणि त्याने ८ ते १० लोकांना बोलावलं आणि अंदाधुंद गोळीबार केला.