दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

वाशीम :- दोन दुचाकीची समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाल्याची घटना रिसोड लोणार मार्गावर ग्राम चाकोलीजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
वाशीम जिल्ह्यातील रिसोड- लोणार मार्गावर झालेल्या अपघातात हिंगोली जिल्ह्यातील इडोळी येथील अमोल तुकाराम घोडके (वय ३२) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील ईडोळी येथील अमोल घोडके हे आपली दुचाकीने लोणारला आपल्या नातेवाईकांना भेटण्याकरिता जात होते. याचवेळी हा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील शेख अहमद शेख मोईन (वय ३५) हे मुलगी आलिया परवीन शेख तोफिक (वय १२) हिला घेऊन दुचाकीने रिसोडच्या दिशेने येत होते. दरम्यान ग्राम चाकोली जवळ अमोल घोडके यांची भरधाव व सुसाट वेगाने चालत असलेली दुचाकीची धडक समोरून येत असलेल्या शेख अहमद यांच्या दुचाकी झाली. घटना एवढी भीषण होती की दोन्ही दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या घटनेमध्ये अमोल घोडके याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
जखमींना वाशिमला केला दाखल
घटनेतील दोन्ही जखमींना प्रथम उपचारानंतर पुढील उपचाराकरिता वाशीम येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती रिसोड पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक, सुनील तीवाले, चालक प्रभाकर इंगोले, माधव इरतकर, होमगार्ड बांगरे यांनी घटनास्थळ धाव घेऊन पाहणी केली. मात्र तत्पूर्वी जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तर मृतकाचा मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.