अमरावती बस स्थानकाबाहेर पुन्हा अवैध खाजगी बसेसचा सुळसुळाट! प्रशासनाचा सुस्त कारभार नागरिकांसाठी डोकेदुखी

अमरावती :- अमरावती बस स्थानकाबाहेर पुन्हा एकदा अवैध खाजगी बसेस आणि वाहनांचा डेपो तयार झाला आहे! सिटी न्यूजने यापूर्वीच यावर बेधडक वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता. वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती, पण आता पुन्हा याच ठिकाणी अवैध बस आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांनी खुलेआम प्रवासी वाहतूक सुरू केली आहे! हे सर्व सुरू असताना प्रशासन आणि वाहतूक विभाग हातावर हात ठेवून बसले आहेत का? चला, पाहूया हा धक्कादायक अहवाल!
अमरावतीच्या मुख्य बस स्थानकाबाहेर खाजगी वाहनांचा बेसाहारा डेपो तयार झाला आहे. शनिवारी दुपारी सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात पुन्हा एकदा अनेक खाजगी बसेस पार्किंग करतानाचे दृश्य कैद झाले. यामध्ये खुलेआम ‘चलो दर्यापूर’ अशा घोषणा देत प्रवासी भरले जात असल्याचेही स्पष्ट दिसले.
याआधी प्रशासनाने काही वेळेस धडक कारवाई केली होती, मात्र हे सर्व फक्त दिखाऊ पद्धतीने होत असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. आजही खाजगी वाहनांचे बेकायदेशीर धंदे रस्त्यावर चालूच आहेत.
रुख्मिणी चौक, सायन्सकोर मैदान भिंतीच्या रांगेत बेकायदेशीर खाजगी बसेस आणि चारचाकी वाहने मोठ्या संख्येने उभी राहत आहेत.
मेळघाटातील कामगार आणि नागरिकांना हेरून प्रवासी भरण्याचे काम खुलेआम सुरू आहे.
बस स्थानकाबाहेर ऑटोवाल्यांची झुंबड, प्रवासी खेचण्यासाठी सुरू असलेली गोंधळाची परिस्थिती!
प्रशासनाचा अभय मिळतोय का? अधिकाऱ्यांचे डोळेझाक धोरण नागरिकांमध्ये संतापाचा सूर.
एस.टी. महामंडळाच्या अधिकृत बसेस प्रवाशांसाठी असतानाही, या खाजगी बसेस आणि ऑटोवाल्यांनी अराजकता माजवली आहे. रस्त्यावरच ऑटो आणि खाजगी बसेस पार्क करून प्रवासी भरले जात आहेत.
सिटी न्यूजने याआधीही यावर आवाज उठवला होता. पण आता प्रश्न असा आहे की, ही वाहतूक माफिया कोणाच्या आशीर्वादाने बळावते आहे? कोणत्या अधिकाऱ्यांचे अभय या बेकायदेशीर धंद्यांना मिळते आहे? आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेशी इतका खेळ का करत आहे?
अमरावती बस स्थानकाबाहेरचा हा बेकायदेशीर कारभार कधी थांबणार? नागरिकांच्या सुरक्षेशी असा खेळ किती दिवस सुरू राहणार? प्रशासन नेहमीप्रमाणे झोपलेलेच राहणार का? आज आपल्यासमोर हे गंभीर वास्तव आहे. सिटी न्यूज अशा बेकायदेशीर धंद्यांना उघड करण्यासाठी सदैव तत्पर आहे. यावर ठोस कारवाई झाली नाही, तर हा विषय आणखी मोठ्या पातळीवर नेला जाईल! तुम्हीही तुमच्या परिसरातील अव्यवस्थेबाबत आवाज उठवा आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी सिटी न्यूजसोबत राहा. धन्यवाद!