“गुप्तधनाचा थरार! महागावमध्ये संशयित टोळी ताब्यात – ग्रामस्थांचा धडाकेबाज प्रतिकार”
यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये गुप्तधनाच्या शोधासाठी आलेल्या टोळीला गावकऱ्यांनी अक्षरशः धू धू धूतं काढलं! नऊ संशयित पोलिसांच्या ताब्यात, दोन गाड्या आणि मेटल डिटेक्टरसह मोठा कट उघड!
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील मोरथ गावात गेल्या काही दिवसांपासून एका जुन्या वाड्यात संशयास्पद हालचाली सुरू होत्या. अचानक, शुक्रवारी खोदकाम अंतिम टप्प्यात असतानाच ग्रामस्थांना संशय आला. गावकऱ्यांनी थेट घटनास्थळी धडक मारली आणि चौकशीस सुरुवात केली. पण संशयितांना हे पटले नाही आणि त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला!
ग्रामस्थांनी या टोळीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि काहींना जागीच चोप दिला! यामुळे संपूर्ण गावात गोंधळ उडाला. लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या वेळी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता उमरखेड आणि महागाव दौऱ्यावर होते, त्यामुळे बंदोबस्त कमी होता. पण तरीही, महागाव पोलिसांनी वेगाने हालचाल करत नऊ संशयितांना अटक केली!
पोलिसांनी संशयितांकडून मेटल डिटेक्टर मशीन, आणि दोन कार MH 49 B 5688 आणि MH 27 BV 0924 जप्त केल्या. तपासात समोर आले आहे की ही टोळी अमरावती आणि यवतमाळ परिसरातील असून त्यांचा उद्देश या ठिकाणी गुप्तधनाचा शोध घेणे होता!
गुप्तधनाच्या मोहापायी अजून किती टोळ्या गावागावांत घुसणार? पोलिसांनी मोठा कट हाणून पाडला असला, तरी अजूनही या गुप्तधनाच्या मुळाशी जाऊन सत्य उघडकीस येईल का? या गुप्त धनाच्या मोहापायी आणखी किती आयुष्य उध्वस्त होणार कि प्रशासन कडक कायदे लागू करणार हे बघावं लागणार आहे