गाडी घासल्यामुळे रिक्षा चालकाने केलेल्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू, धक्कादायक घटना

गोवा,बेळगाव :- गोव्यातील फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार (६८) यांचा बेळगावात रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीनंतर मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. मृत्यूचे नमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
लवू मामलेदार हे बेळगावातील श्रीनिवास लॉज येथे थांबले होते. शनिवारी दुपारी ते खडेबाजार येथून लॉजच्या दिशेने आपल्या कारमधून जात होते. त्या वेळी त्यांची कार एका रिक्षाला घासली. रिक्षाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे पाहून ते पुढे गेले. रिक्षाचालक त्यांच्या कारचा पाठलाग करत लॉजपर्यंत पोचला. नंतर त्याने मामलेदार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली.
या वेळी तेथे जमलेल्या लोकांनी आणि लॉजच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून मामलेदार यांना सोडविले, नंतर त्यांना लॉजमध्ये जाण्यास सांगितले. लॉजमध्ये रिसेप्शनजवळ पोचल्यावर ते तेथेच खाली कोसळले. त्यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन कन्या असा परिवार आहे. पोलिस अधिकारी ते आमदार असा त्यांचा प्रवास होता.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहे, ज्यामध्ये हल्ल्याची घटना स्पष्टपणे दिसत आहे.ऑटो चालकाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज हा महत्त्वाचा पुरावा आहे. लवकरच हे प्रकरण उलगडेल असे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हेगाराला शिक्षा होईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.