रस्त्याने चाललेल्या माय-लेकराला फॉर्च्यूनर उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू

नंदुरबार :- शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर एका सुसाट फॉर्च्यूनर गाडीने पायी चालत असलेल्या आई व लेकाला जोरात धडक मारून उडवल्याची घटना 17 फेब्रुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भरधाव वेगात मोटरसायकल व चार चाकी वाहने जात-येत असतात. याबाबत बांधकाम विभागाला पंधरा दिवसांपूर्वीच गतिरोधक बसवण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आई व मुलाला जीव गमवावा लागल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
काय घडलं नेमकं?
शहादा शहरातील द्वारकाधीशनगर मध्ये राहणारे कल्पना गजानन वाघ व आकाश गजानन वाघ हे पायी डोंगरगाव रस्त्यावरून आपल्या घराकडे जात होते. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या भरधाव फॉर्च्यूनर ( क्र. एम.एच. 15,जे. ए.5055 ) यावरील अज्ञात चालकाने कल्पना गजानन वाघ व आकाश गजानन वाघ या दोघांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात कल्पना गजानन वाघ व आकाश गजानन वाघ या मायलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर सायंकाळपासून पायी फिरणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणावर नेहमीच वर्दळ असते. मात्र या परिसरात दुचाकी तसेच चार चाकी वाहनधारक भरधाव वेगाने जात असतात. याप्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी या रस्त्यावर जागोजागी गतिरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मायलेकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने भरधाव जाणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी ही करण्यात येत आहे.
पायी चालत आपल्या घराकडे निघालेल्या माय लेकराच्या अशा अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठीच नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागात रस्त्यांवर गतीरोधक बसवण्यासाठी निवेदन दिले होते. परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मायलेकाला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.