नागपूरमध्ये पोलिसांनी उघडकीस आणले घरफोडीचे दोन गुन्हे

नागपूर :- आपण पाहत आहात सिटी न्यूज, एक नजर टाकुया नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूर शहरातील युनिट क्र. ०५ पोलिसांनी घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी, युनिट क्र. ०५ चे अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याने दोन घरफोडींची कबुली दिली आहे आणि त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील युनिट क्र. ०५ पोलिसांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री २१.५० वाजता पेट्रोलिंग करत असताना, यशोधरानगर हद्दीत आजरी माजरी बोगदया जवळून एक संशयित आरोपी उस्मान खान (वय २१, रा. कौशल्या नगर, कपिलनगर) ला ताब्यात घेतले. आरोपीला त्याच्या नावाचा आणि पत्त्याचा विचारल्यावर त्याने आपली ओळख सांगितली आणि पोलिसांनी त्याच्या अभिलेखांची तपासणी केली. त्यात तो पोलीस ठाणे कपिलनगर येथे चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी म्हणून ओळखला गेला.
आरोपीची सखोल विचारपूस केली असता, त्याने कबूल केले की त्याने त्याच्या साथीदार प्रज्वल उर्फ पज्जू भगत (रा. म्हाडा क्वॉर्टर, कपिलनगर) आणि इतर साथीदारांसह कन्हान, नागपूर ग्रामीण हद्दीत दोन घरफोडी केल्या. आरोपीच्या ताब्यातून मंगळसुत्राचे मणी, पिवळ्या धातूचा तुकडा, चांदीची पायपट्टी आणि ३,००० रुपये रोख रक्कम अशी एकूण ४६,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीस मुद्देमालासह कन्हान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
या कामगिरीला पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, सह. पोलीस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, आणि पोलीस उप आयुक्त राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच, पोलिस निरीक्षक राहुल शिरे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील अपडेट्स देऊ. बघत रहा सिटी न्यूज.